अमरावती - वरूड नजीकच्या सावंगा येथे ग्रामपंचायतच्या आमसभेत सत्ताधारी-विरोधकांमध्ये मारहाणीच्या घटनेतील आरोपी जामिनासाठी जात असताना त्यांचे चारचाकी वाहन क्षुल्लक कारणाहून फोडण्यात आले. ही घटना मंगळवारी सकाळी ९ वाजताच्या दरम्यान घडली. याप्रकरणी बनोडा पोलिसांनी दोघांविरुद्ध गुन्हा नोंदविला.
प्राप्त माहितीनुसार, सावंगा येथे ३० जानेवारीला ग्रामपंचायतीची आमसभा झाली. यात सत्ताधारी-विरोधकांमध्ये मारहाण झाली. विरोधकांवर अॅट्रॉसिटी अन्वये कारवाई करण्यात आली. या प्रकरणातील आठ आरोपी जामीन मिळविण्यासाठी एमएच २७ एआर ८४५९ क्रमांकाच्या चारचाकी वाहनाने वरूड येथे जात होते. त्याचवेळी अक्षय संजय निकम (२२) हा मेंढ्यांचा कळप घेऊन जात होता. त्यातील एका मेंढीला वाहनाचा धक्का लागला. यावरून अक्षय निकम याने गाडीच्या काचावर बुक्की मारली व कुºहाडीने काचा फोडल्या. यात रमेश गुलाब बल्लार (५२) व सुरेश नारायण टेकोडे (५०) हे दोघे जखमी झाले. घटनेनंतर बनोडा पोलिसांत परस्परविरोधी तक्रारी नोंदविण्यात आल्या आहेत. अक्षय निकम यांच्या तक्रारीवरून मनीष पुरुषोत्तम टेंभे यांच्याविरुद्ध भादंवि कलम २७९, ४२९ अन्वये गुन्हा दाखल केले, तर मनीष टेंभे यांच्या तक्रारीवरुन अक्षय संजय निकम याच्याविरुध्द भादविचे कलम ३३६, ५०४, ५०६, ३२३, ४२७ अन्वये गुन्हा नोंदविला. बेनोड्याचे ठाणेदार शांतीकुमार पाटील पुढील तपास करीत आहेत.