अमरावती : शेगावी दर्शन करून नागपूरकडे जात असताना ओव्हरटेकच्या प्रयत्नात कार शासकीय रुग्णवाहिकेवर धडकल्याचे निरीक्षण लोणी पोलिसांनी नोंदविले आहे. लोणी ठाण्याच्या हद्दीतील नागझरी फाट्याजवळ घडलेल्या अपघातात नागपूर येथील चौघांचा मृत्यू झाला. शवविच्छेदनानंतर सोमवारी सकाळी मृतदेह नातेवाइकांच्या स्वाधीन करण्यात आले. लोणी पोलिसांनी कारचालकाविरुद्ध भादंविच्या कलम २७९, ३३७, ३३८, ३०४ (अ) अन्वये गुन्हा नोंदविला आहे. या अपघातात प्रकाश चिंधुजी रोकडे (५८), रमेश चिंधुजी रोकडे (६०), मनीषा प्रकाश रोकडे (४८) व पाच वर्षीय चिमुकला सोहम नितीन महाजन (सर्व रा. वाडी, नागपूर) यांचा मृत्यू झाला, तर कारमधील निखिल रमेश रोकडे, अनिता रमेश रोकडे, रोशनी रोकडे गंभीर जखमी झाले आहेत. रुग्णवाहिकेतील महेंद्र यशवंत खाडे, अभिजित पाठक व डॉ. रवींद्र ठाकरे किरकोळ जखमी झाले आहेत. नागपूर येथील रोकडे कुटुंबीय शेगाव दर्शनासाठी गेले होते. तेथून परत येताना लोणी हद्दीत त्यांच्या कारने एका वाहनाला ओव्हरटेक केले. या प्रयत्नात समोरून येणाºया रुग्णवाहिकेवर कार जाऊन धडकली. धडक इतकी गंभीर होती की, या अपघातात रोकडे यांच्या कारचा चुराडा झाला.
ओव्हरटेक करताना कार रुग्णवाहिकेला धडकली. याप्रकरणात कारचालकाविरुध्द गुन्हा नोंदविण्यात आला आहे. शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाइकांच्या स्वाधीन करण्यात आले असून, जखमींवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. नागेश चतरकर,पोलीस निरीक्षक, लोणी ठाणे.