अमरावती : देशात सध्या सामाजिक आणि धार्मिक अस्थिरता निर्माण झाली आहे. अशा या परिस्थितीशी लढा देण्यासाठी एकत्र येऊन पुन्हा महापुरुषांच्या विचार आजच्या युवकांमध्ये पोहोचविण्याची गरज आहे. याकरिता मराठा सेवा संघाच्या वतीने जनसंवाद दौरा सुरू आहे. आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने उद्धव बाळासाहेब ठाकरे गटासोबत संभाजी ब्रिगेडची युती आहे. त्यामुळे महाविकास आघाडीमध्ये ठाकरे गटाला मिळणाऱ्या एकूण जागांपैकी बुलडाणा आणि हिंगोली या दोन जागांची मागणी करण्यात आल्याचे पुरुषोत्तम खेडेकर यांनी दिली.
मराठा सेवा संघाच्या वतीने राज्यभर दि. १६ जानेवारी ते दि. ३१ जानेवारीपर्यंत जनसंवाद दौरा सुरू करण्यात आला आहे. यानिमित्ताने पुरुषोत्तम खेडेकर शनिवारी अमरावतीत होते. यावेळी त्यांनी माध्यमांशी पत्रकार परिषदेतून संवाद साधला. ते म्हणाले, सध्या देशात युवकांमध्ये रोजगाराची मोठी समस्या निर्माण झाली आहे. तसेच बहुजनांच्या मुलांसाठी शिक्षणाची दारे बंद करणारे अनेक निर्णय होत आहेत. स्त्रियांमध्ये भीतीचे वातावरण आहे. देशातील सामाजिक आणि धार्मिक सलोखा नष्ट करण्याचे काम सुरू आहे. महापुरुषांच्या विरोधात बोलणारी लोक महाराष्ट्रात येत आहेत. त्यामुळे मराठा सेवा संघ पुन्हा एकदा जनसंवाद दौऱ्यातून महापुरुषांचे विचार मांडणारे नव युवक तयार करून पुन्हा एकदा कामाला लागली आहे.
कोविडनंतर मराठा सेवा संघाचे काम काही प्रमाणात कमी झाले होते. त्याला पुन्हा सुरू करण्याचा उद्देशाने जनसंवाद दौरा आहे. तसेच लोकसभा निवडणुकीत उद्धव ठाकरे यांच्याशी संभाजी ब्रिगेडची युती असून, येणाऱ्या काळात महाविकास आघाडीसाठी काम करणार असल्याचेही पुरुषोत्तम खेडेकर यांनी स्पष्ट केले. यावेळी अरविंद गावंडे, अविनाश चौधरी, मधुकर मेहकरे, अर्जुन तनपुरे उपस्थित होते.