अमरावती : काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मेक इन इंडिया ड्रोन स्टार्टअप ‘गरुड’ एरोस्पेसच्या सुविधांचे एकाच वेळी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे अनेक ठिकाणी उद्घाटन केले. त्यानंतर अमरावती जिल्ह्यात प्रथमच या शेतकरी ड्रोनचे सोमवारी प्रात्यक्षिक होणार होते. परंतु आयोजकांच्या ढिसाळ नियोजनामुळे तसेच ड्रोनसाठी लागणारे साहित्यच आणले नाही. त्यामुळे प्रत्यक्षात ड्रोन उडू शकला नाही. त्यामुळे अनेकांचा हिरमोड झाला.
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचा एक भाग म्हणून एका अभिनव कार्यक्रमात पंतप्रधानांनी एकाच वेळी १०० गावांमध्ये त्यांच्या कमांड सेंटरमधून १०० शेतकरी ड्रोन लॉन्च केले आणि १६ वेगवेगळ्या राज्यांमध्ये फवारणी सुरू केली. त्यानंतर अमरावती जिल्ह्यात सोमवारी पहिल्यांदाच हे शेतकरी प्रत्यक्षात ड्रोनच्या साह्याने फवारणीला सुरुवात करणार होते. परंतु आयोजकांच्या ढिसाळ नियोजनामुळे मात्र शेतकरी ड्रोनचे प्रात्यक्षिक होऊ शकले नाही. अमरावतीनजीकच्या घातखेड येथे ‘गरुड’ शेतकरी ड्रोन प्रात्यक्षिकाचे आयोजन करण्यात आले होते.
ड्रोन प्रात्यक्षिक होऊ शकले नाही. खरे तर सोमवारी या ड्रोनबाबत सविस्तर माहिती देण्यात आली. देशाच्या २२ केंद्रांत वेबिनार घेण्यात आला. शेतकरी ड्रोनबाबत तांत्रिक माहिती, फायदे सांगण्यात आले. समन्वय नसल्याने ड्रोन प्रत्यक्षात उडू शकले नाही. मात्र, लवकरच कार्यक्रमातून शेतकरी ड्रोन उडविला जाईल.
- पंकज पेढे, मीडिया पार्टनर.