अमरावती- महापालिकेच्या उद्यान विभागात कार्यरत लिपिक श्रीकांत गिरी यांनी विषारी द्रव्य घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. त्यांना तातडीने रुग्णालयात हलविण्यात आल्याने आणि वेळेत उपचार झाल्याने त्यांचे प्राण वाचू शकले. १ डिसेंबर रोजी रात्री ८ ते ८.३० च्या सुमारास ही घटना घडल्याचे महापालिका सूत्रांनी सांगितले.
गिरी यांनी विषाचा घोट घेण्यापूर्वी दोन स्थानिक माध्यमे व एका राजकीय पक्षाच्या युवक आघाडीच्या पदाधिकाऱ्याची नावे लिहून ठेवल्याची माहितीही महापालिकेतील त्यांच्या सहकाऱ्यांनी ‘लोकमत’ला दिली.
उद्यान विभागात कार्यरत गिरी व एका कंत्राटदाराच्या संगनमताने उद्यान विभागात अनागोंदी माजल्याचा आरोेप करण्यात आला होता. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोप मागे घेण्यासाठी गिरी यांना काही रक्कमदेखील मागण्यात आली होती. मात्र, तो ताण सहन न झाल्याने गिरी यांनी आत्मघाताचा प्रयत्न केल्याचे त्यांच्या सहकाऱ्यांकडून सांगण्यात आले. दरम्यान, गिरी यांना बुधवारी तातडीने राजापेठ स्थित एका खासगी रुग्णालयात हलविण्यात आले.