अमरावती : तृतीयपंथी समुदायाला बदनाम करणाऱ्या त्या दोन तरुणावर गुन्हा दाखल करा, या मागणीसाठी शुक्रवारी इर्विन चौकात तृतीय पंथीयांनी ठिय्या दिला. आंदोलनदरम्यान एका तृतीयपंथीने अंगावर रॉकेल घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केल्याने चांगलाच गोंधळ उडाला. सुदैवाने तेथे उपस्थित महिला पोलिसांनी तत्काळ रॉकेल अंगावर घेणाऱ्या त्या तृतीयपंथीला पकडल्याने मोठा अनर्थ टळला. यावेळी तृतीयपंथींयांनी रोष व्यक्त केल्याने पोलिसांची ताराबंळ उडाली.
अखेर पोलिसांनी तृतीयपंथी व लॉयन्स ग्रुपच्या सदस्याना ठाण्यात बोलावून सामंजस्याने समझौता घडवून आणला. काही दिवसांपूर्वी दोन तरुण नृत्य कलाकार तृतीयपंथी बनून फिरत असल्याचे निंभोरा येथील तृतीयपंथींना आढळून आले होते. हा प्रकार पाहून तृतीयपंथींयांनी त्यांना पकडून नग्न करून त्यांचे केस कापले. घटनेच्या तक्रारीवरून बडनेरा पोलिसांनी तृतीयपंथीयांविरुध्द गुन्हा नोंदविला. दरम्यान त्या दोन कलाकारांना न्याय मिळवून देण्यासाठी लॉयन्स ग्रुपचे सदस्य सरसावले. परंतु आम्हाला नकली तृतीयपंथी म्हटल्याचा आरोप तृतीयपंथींयांनी लॉयन्स ग्रुपवर केला. हा प्रकार बदनामीकारक असल्यामुळे आमच्या भावना दुखावल्याचे मत तृतीयपंथीयांनी व्यक्त केले. यावरून तृतीय पंथींयांनी त्या दोन तरुणांवर गुन्हा नोंदवा, अशी मागणी करून इर्विन चौकात शुक्रवारी ठिय्या दिला. यावेळी वरिष्ठ पोलीस निरीक्षक आसाराम चोरमले यांच्या मार्गदर्शनात पोलिसांचा तगडा बंदोबस्त होता.