वरूड (अमरावती) : मुलताई (मध्य प्रदेश) येथून गोवंशाची तस्करी करणारा ट्रक येत असल्याच्या गोपनीय माहितीवरून वरूड पोलिसांनी पाठलाग केला. चालकाने पोलिसांच्या वाहनावर ट्रक घालण्याचा प्रयत्न केला. तथापि, हुलकावण्या देणाऱ्या ट्रकला अखेर जरूड रस्त्यावर फिल्मीस्टाइल पकडण्यात पोलिसांना यश आले. ट्रकमधून आठ बैल आणि २० गायी अशी २८ जनावरांची तस्करी केली जात होती. काही जनावरे बेशुद्ध, तर एक गाय मृत आढळून आली. याप्रकरणी तीन आरोपींना अटक करून गुन्हे दाखल करण्यात आले.
पोलिस सूत्रांनुसार, आरोपींची नावे सनाउर रहमान अजीजुर रहमान (३३), शाहरुख खान अताउर रहमान (२६, दोन्ही रा. बामणी, जि. शिवनी) फुलसिंह छत्तरसिंह उईके (३५, रा. बोरीकला, ता. बरघाट, जि. शिवणी) अशी आहेत. ते ट्रकमधून जनावरे कत्तलखान्याकडे नेत असल्याची गोपनीय माहिती ठाणेदार प्रदीप चौगावकर यांना मिळाली.
बुधवारी सकाळी ६ वाजता प्रभारी ठाणेदार सतीश इंगळे यांच्या नेतृत्वात उपनिरीक्षक धीरज राजूरकर, पोलिस अंमलदार राजू चव्हाण, विनोद पवार, सचिन भगत, प्रफुल्ल लेवलकर, आकाश आमले, गौरव गिरी, जॉन रुबेन, सागर लेवलकर यांच्या पथकाने शेंदूरजना घाट-मुलताई रस्त्यावर नाकेबंदी केली. तेथून ट्रक काढल्यानंतर पोलिसांनी पाठलाग केला. १० लाखांच्या ट्रकमध्ये ३ लाख ५७ हजार रुपयांची जनावरे असा एकूण १३ लाख ५७ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. गुन्हे नोंदवून आरोपींना अटक करण्यात आली. पुढील तपास ठाणेदार प्रदीप चौगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली वरूड पोलिस करीत आहेत.