अमरावती :जिल्हा परिषद कार्यालयात काही अधिकारी व कर्मचारी कार्यालयात उशिराने येत असल्याने कामानिमित्त आलेल्या नागरिकांना वाट पाहत बसावे लागते. यामुळे मुख्य कार्यकारी अधिकारी अविश्यांत पंडा यांनी अधिकारी व कर्मचारी वर्गाला वेळेची शिस्त लागावी, यासाठी प्रशासनाने बायोमेट्रिक प्रणाली १ सप्टेंबरपासून विविध विभागात लावण्याचे आदेश दिले आहेत. यासंदर्भात १७ ऑगस्ट रोजी आदेश निर्गमित केले आहे. यामुळे लेटलतीफ कर्मचाऱ्यांना चाप बसल्याने नागरिकांना दिलासा मिळाला आहे.
जिल्हा मुख्यालयातील वर्ग तीन आणि चारच्या कर्मचाऱ्यांना हजेरीसाठी बायोमेट्रिक प्रणालीवर उपस्थितीची नोंद घेणे आता बंधनकारक केले जाणार आहे. कार्यालयात येण्याची, तसेच जाण्याची नोंद या पद्धतीनुसारच करण्यात यावी, असे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी या आदेशात स्पष्ट केले आहे. जिल्हा मुख्यालय, तसेच पंचायत समितीच्या कार्यालयात यापूर्वी वेळेची नोंद घेण्यासाठी लावण्यात आलेल्या बायोमेट्रिक मशीन कालबाह्य झालेल्या आहेत, त्यामुळे उपस्थितीची नोंद होत नाही. बरेच कर्मचारी हजेरीपटावर स्वाक्षरी करतात; परंतु त्याद्वारे कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीबाबत अचूकता येत नाही. त्यामुळे एक सप्टेंबरपूर्वी बायोमेट्रिक प्रणाली सर्व विभागांनी लावून घ्यावी, असे आदेश अविश्यांत पंडा यांनी दिले आहेत. जिल्हा परिषदेच्या एकूण १४ विभागांना त्यांनी हे आदेश दिले.