अमरावती : राज्य विधिमंडळाची पंचायतराज समिती ६ ते ८ ऑक्टोबरला जिल्हा परिषदेला भेट देणार आहे. या तीनदिवसीय दौऱ्याचे अनुषंगाने मिनी मंत्रालयाकडून माहिती मागविली होती. याकरिता गत काही दिवसांपासून माहिती संकलनासाठी जि.प.ची प्रशासकीय यंत्रणा कामाला लागली होती. अशातच पंचायत राज समितीने मागविलेल्या माहितीचा लेखाजोखा संकलित होताच या सर्व माहितीचे गठ्ठे दोन अधिकारी व दोन कर्मचारी घेऊन मुंबईला रवाना झाले आहेत. ही माहिती विधिमंडळ सचिवालय व ग्रामविकास विभागाकडे सुपूर्द केली जाणार आहे.
पंचायतराज समितीच्या आगामी दौऱ्याचे अनुषंगाने जिल्हा परिषदेस भेट व बैठकीच्या वेळी सन २०१६-१७ या वर्षाच्या लेखा परीक्षण पुनर्विलोकन अहवाल आणि सन २०१७-१८ च्या वार्षिक प्रशासन अहवालाचे परीक्षण केले जाणार आहे. या अनुषंगाने जिल्हा परिषदेच्या सर्व विभागात १४ सप्टेंबरपासून पीआरसीच्या दौऱ्यामुळे मागविलेल्या माहितीची जुळवाजुळव सुरू झाली होती. जिल्हा परिषदेतील बहुतांश अधिकारी व कर्मचारी आपापल्या विभागातील यासंदर्भातील माहिती संकलित करण्यात दिवस-रात्र काम करीत होते. विशेष म्हणजे शनिवार व रविवार या शासकीय सुटीच्या दिवशी मिनी मंत्रालयात प्रशासकीय कामकाज सुरू होते. अशातच मंगळवारी (दि.२० सप्टेंबर) पीआरसीने मागविलेली माहिती संकलित होताच माहितीबाबतचा लेखाजोखा एकत्रितरीत्या विधिमंडळ सचिवालय व ग्रामविकास विभागाकडे सादर केला जाणार आहे. ही सर्व माहिती घेऊन सामान्य प्रशासन विभागाचे डेप्युटी सीईओ तुकाराम टेकाळे, मुख्य लेखा व वित्त अधिकारी चंद्रशेखर खंडारे व दोन कर्मचारी याकरिता मुंबईवारी गेले आहेत.