अमरावती : नैसर्गिक, अपघात, घातपात अथवा शिकारीने गत तीन वर्षात किती वाघ, बिबट्यांचे मृत्यू झालेत, याचे वन्यजीव विभागाकडून ऑडिट सुरू झाले आहे. त्याअनुषंगाने राज्याच्या वन्यजीव विभागाने २०१८ ते २०२१ या तीन वर्षात दगावलेल्या वाघ, बिबट्याचा अहवाल मागविला आहे. त्यामुळे वन्यजीव, वन विभागाची चमू माहिती गोळा करण्यासाठी धावाधाव करीत आहे.
विदर्भात वाघ, बिबट्यांची संख्या वाढली यात दुमत नाही. मात्र, तीन ते चार वर्षांपासून वन्यजीवांच्या मृत्यूच्या घटनांमध्ये देखील वाढ झाली आहे. विशेषत. वाघ, बिबट्यांच्या मृत्यूने वन्यजीव विभाग हैराण झाला आहे. त्यामुळे सन २०१८-२०१९, २०१९-२०२०- २०२१-२०२१ या तीन वर्षात वाघ, बिबट्या्च्या मृत्यूची कारणे शोधण्यात येत आहे. राज्याचे वनबल प्रमुख पी. साईप्रसाद यांनी नुकतेच काही दिवसांपूर्वी वनविभागाचे ११ वनवृत्त आणि वन्यजीव विभागाच्या ५ विभागाच्या प्रमुखांशी आभासी पद्धतीने संवाद साधून वाघ, बिबट्याच्या मृत्यूची कारणे आणि त्यामागील भूमिका अहवालाच्या माध्यमातून मागविली आहे. गत काही दिवसांपासून वन विभागात त्याचीच लगबग सुरू झाली आहे.
---------------
असा सादर करावा लागेल अहवाल
वाघ, बिबट्याच्या मृत्यूची कारणे देताना त्यामागील वस्तुनिष्ठ अहवाल अनिवार्य आहे. लपवाछपवी झाल्यास संबंधित अधिकाऱ्यांवर जाबबादारी निश्चित होणार आहे. वाघ, बिबट्याच्या घातपाती, नैसर्गिक मृत्यू झाल्यास तसे पुरावे द्यावे लागणार आहे. किंबहुना शिकार झाल्यास याप्रकरणी आरोपी, गुन्ह्याचे स्वरूप, साहित्य जप्ती, कातडे आदी माहिती पुराव्यानिशी द्यावे लागणार आहे. हा डेटा वन विभागात परिक्षेत्रनिहाय गोळा करण्यात येत आहे.