अमरावती : औरंगाबाद-नागपूर हायवेवरील वाहतूक शुक्रवारी तब्बल तीन तास ठप्प होती. खड्ड्यांमुळे ट्रकचे एक्सल रस्त्याच्या मधोमध तुटल्याने तो बंद पडल्याने दोन्ही बाजूची वाहतूक विस्कळित झाली होती.
धामणगाव रेल्वे तालुक्यात संततधार पावसामुळे रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. काही ठिकाणी पुरामुळे रस्ता खरडून गेला. यादरम्यान शुक्रवारी सकाळी ११ वाजता औरंगाबाद-नागपूर महामार्गावर बोरगाव धांदेनजीक महामार्गाच्या मधोमध पडलेल्या खड्ड्यामुळे एका ट्रकचे एक्सेल तुटले. त्यामुळे एकीकडे पुलगाव, तर दुसरीकडे देवगाव या बाजूला तीन किलोमीटरपर्यंत ट्रकची वाहतूक ठप्प झाली होती. संबंधित मेकॅनिक आणायला तब्बल दोन तास लागल्यामुळे अनेक प्रवाशांना ठप्प झालेल्या वाहतुकीचा मनस्ताप सहन करावा लागला, तर वाहतूक पोलिसांना रस्ता मोकळा करण्यासाठी मोठी कसरत करावी लागली.