अमरावती : मुंबई, पुणे या बड्या शहरांच्या तुलनेत अमरावती महानगरात जवळपास सर्वच ऑटोरिक्षांना मीटर बसविले आहे. मात्र, ते नावापुरतेच असून, मीटरने कोणताही प्रवासी ना भाडे देतो, ना ऑटोरिक्षा चालक मीटर चालू करतात. जवळपास सर्वच मार्गांवर किमीप्रमाणे ऑटोरिक्षांचे भाडे निश्चित आहे.
अमरावती महानगरात पाच हजार ऑटोरिक्षा असल्याची नोंद येथील प्रादेशिक परिवहन विभागात करण्यात आली आहे. ऑटोरिक्षा पॉसिंगच्या वेळी प्रत्येक ऑटोला मीटर असतेच. त्याशिवाय आरटीओ ऑटोरिक्षाचे पॉसिंग करीत नाही. मात्र, शहरात ऑटोरिक्षाला मीटर असताना ते केवळ शोभेची वास्तू ठरली आहे. ऑटोरिक्षाने कोणत्याही भागाचा प्रवास करायचा असल्यास प्रतिव्यक्तीनिहाय भाडे ठरले आहे. किंबहुना ऑटोरिक्षा स्पेशल प्रवास करायचा असल्यास तसे भाडे आकारले जाते. प्रवाशांना परवडले तर ते ऑटोरिक्षाने प्रवास करतात. अन्यथा भाडेतत्त्वावर ऑटोने ये-जा करतात. मात्र, अमरावती महानगराच्या कोणत्याही मार्गाने ऑटाेरिक्षाने प्रवास करायचे ठरविल्यास कोणीही मीटरने भाडे देत नाही वा ऑटोरिक्षा चालक मीटरने भाडे घेत नाही.
प्रवास अंतरानुसार ठरते भाडे
शहर असो वा ग्रामीण कुठेही ऑटोरिक्षाने प्रवास करायचा असल्यास अंतरानुसार ऑटोरिक्षांचे भाडे ठरविण्यात आले आहे, तसेच महानगरातही विशिष्ट मार्ग, रस्ते, काही ठिकाणावर ये-जा करण्यासाठी ऑटोरिक्षाचे भाडे आकारले जाते. मीटरने कोणीही भाडे देत नाही.
रिक्षामीटर शोभेलाच
शहरात प्रत्येक ऑटोरिक्षाला मीटर बसविण्यात आले आहे. प्रादेशिक परिवहन नियमावलीनुसार ऑटोरिक्षांचे भाडे हे मीटरनुसार आकारणे अपेक्षित आहे. मात्र, अमरावतीकर जनतेला ऑटोरिक्षाला मीटर असते हे माहितीच नाही, ही वस्तुस्थिती आहे. मार्ग, ठिकाणानुसार निश्चित भाडे दिले की ऑटोरिक्षाने प्रवास केला जातो.
शेअर रिक्षा सर्वात मोठी डोकेदुखी
ऑटो रिक्षात मीटर असले तरी कोणताही चालक मीटरने भाडे आकारत नाही. त्यामुळे शेअर रिक्षाने प्रवास करणे महागडे आहे. प्रति प्रवासी भाडे आकारणीनुसार प्रवास करायचा असल्यास ऑटो रिक्षात पूर्णपणे प्रवासी गोळा करेपर्यंत थांबावे लागते. ही सर्वात मोठी डोकेदुखी ठरत आहे.
येथे करा तक्रार
ऑटो रिक्षा असो वा शहर बस, एसटी संदर्भात काही तक्रार असल्यास प्रवाशांना येथील प्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयात ०७२१/ २६६२०३२ या क्रमांकावर तक्रार नोंदवावी. तसेच आरटीओच्या संकेतस्थळावर ऑनलाईन तक्रार करण्याची सुविधा उपलब्ध आहे.
‘‘ मुंबई येथून बडनेरा रेल्वे स्थानकावर आलो असता विद्यापीठात जायचे होते. मात्र, ऑटोरिक्षा चालकाला मीटर सुरू कर असे म्हटले. पण, मीटरने नव्हे तर, २०० रुपये भाडे लागेल, असे रिक्षा चालक म्हणाला. त्यानुसार भाडे द्यावे लागले.
- प्रशांत वाघमारे, प्रवासी.
शहरात प्रत्येक ऑटोरिक्षाला मीटर बसविले आहे. त्याशिवाय ऑटोरिक्षाची पॉसिंग होत नाही. मात्र, प्रवासी परवडेल त्यानुसार ऑटाेरिक्षाने प्रवास करतात. मुंबई, पुण्यासारखी येथे ऑटोरिक्षा मीटरची सक्ती करता येत नाही.
- सिद्धार्थ ठोके, आरटीओ, अमरावती.