अमरावती : भारतरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर आणि स्वामी विवेकानंद यांनी काही दशकांपूर्वीच देशातील पारंपारीक शैक्षणिक पद्धतीमध्ये परिवर्तन साधण्याचे सुचवले हाेते. मात्र त्यावर दुर्लक्ष हाेत गेले. परिणामी आधुनिक युगामध्ये शिक्षण क्षेत्र वेगाने व्यापक हाेत असताना राेजगाराच्या संधी मात्र संकुचीत हाेत असल्याचे वास्तव समोर आहे. एकूणच आजचे शिक्षण व रोजगाराची परिस्थिती पाहता शारीरिक शिक्षणाला महत्व प्राप्त होत आहे. मंडळाच्या स्वायत्त महाविद्यालयाने साकारलेले शैक्षणिक धाेरण येथील विद्यार्थ्यांच्या सक्षमीकरणाला चालना देत असून असे शैक्षणिक क्रीडा धाेरण देशासाठी आदर्श मार्गदर्शक असल्याचे मत संत गाडगेबाबा अमरावतीविद्यापीठाचे कुलगुरू डाॅ. प्रमोद येवले यांनी व्यक्त केले.
संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाशी संलग्नीत श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळद्वारा संचालित स्वायत्त डिग्री काॅलेज ऑफ फिजिकल एज्युकेशन महाविद्यालयाचा ९ वा दीक्षांत समारंभ बुधवारी मंडळाच्या स्व. साेमश्वर पुसतकर सभागृहात पार पडला. या सोहळ्याला अध्यक्ष म्हणून कुलगुरू डाॅ. प्रमोद येवले उपस्थित हाेते. मार्गदर्शक पद्मश्री प्रभाकरराव वैद्य यांच्यासह प्रमुख अतिथी महासंचालक तंत्र शिक्षणचे डाॅ. व्ही. आर मानकर, उच्च शिक्षण महासंचालक अमरावती विभागाच्या डाॅ. नलिनी टेंभेकर, प्राचार्य डॉ. अविनाश मोहरील, डिग्री कॉलेज ऑफ फिजिकल एज्युकेशनचे प्राचार्य डाॅ. श्रीनिवास देशपांडे, मंडळाच्या सचिव व उपप्राचार्य डाॅ. माधुरी चेंडके, सचिव डॉ. विकास कोळेश्वर, परीक्षा नियंत्रक डाॅ. विजय पांडे, डाॅ. बेलसरे, डाॅ. सुनील लाबडे, डाॅ. लक्ष्मीकांत खंडागळे, डाॅ. संजय येडे, प्रा. दीपा कान्हेगावकर, डाॅ. शीतल काळे, प्रा. मयुर दलाल आदी उपस्थित हाेते.
कार्यक्रमाची सुरूवात मान्यवरांच्याहस्ते दीपप्रज्वलन, राष्ट्रीय, विद्यापीठ गीताने झाली. मंडळाच्या स्वायत्त महाविद्यालयाच्या २०२२-२३ सत्रातील बीपीईएस, बीपीएड, एमपीएड, बीएससी, एमएससी,बीसीए, एमसीए, बीबीए, एमसीए व योग, बी-व्होक, एम-व्होक शाखेतील तब्बल १०१९ गुणवंतांना पदवी देण्यात आली. यामध्ये प्राविण्यप्राप्त विद्यार्थ्यांना १९ सुवर्ण, १६ राैप्य, १८ कांस्य व २२ प्रमाणपत्रासहीत पदवी देत सन्मानित करण्यात आले. यावेळी डॉ. ललित शर्मा यांना आचार्य पदवी देत सन्मानित करण्यात आले. नंतर उपस्थित मान्यवरांनी मार्गदर्शन करीत विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीकरीता शुभेच्छा दिल्या.