अमरावती : ऑटोरिक्षाचालक आणि सामाजिक कार्यकर्ता असलेल्या वराच्या लग्नाची वरात चर्चेचा विषय ठरली आहे. सरस्वतीनगरातून पंचवटी येथे ऑटोरिक्षांमधून नवरदेवासह वऱ्हाडी मंडळी लग्नमंडपी पोहोचली. त्यावेळी रस्त्याने ऑटोरिक्षांची एकच रांग लागली होती. ऑटोरिक्षांची ही रांग पाहून रस्त्यात बघ्यांनी एकच तोबा गर्दी केली होती.
शहरातील सरस्वती नगरमधील 28 वर्षीय युवक संतोष सुभाष किरनाके याचा विवाह 10 जुलै रोजी पंचवटीवरील श्रीगुरुदेव प्रार्थना मंदिरात सकाळी 11.12 वाजता पार पडला. त्यापूर्वी सकाळी 9.30 ते 10.30 या वेळेत शहरातून वरात काढण्याची परवानगी पोलीस आयुक्तांकडे मागण्यात आली होती. गाडगेनगर पोलीस ठाण्यासमोरुन पंचवटी रोड पुलावरून इर्विन चौकात ही सुमारे 30 ऑटोरिक्षांची वरात आली. येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला हार अर्पणानंतर नवरदेवाने बियाणी चौकातील राणी दुर्गावतीच्या पुतळ्याला अभिवादन केले. त्यानंतर वरात लग्नमंडपी पोहोचली. एका रांगेने एवढ्या मोठ्या संख्येने निघालेल्या ऑटोरिक्षांमुळे प्रवासी आणि नागरिकांचे लक्ष आपसूकच या अनोख्या वरातीकडे गेले.