अमरावती : येथील संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात विद्यार्थ्यांचे विविध शैक्षणिक प्रश्न, मागण्या सोडविण्यासाठी गुरुवारी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने हल्लाबोल केला. कुलगुरु मधुसूदन चांदेकर यांना शैक्षणिक प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी साक डे घालण्यात आले.अभाविपचे प्रदेशाध्यक्ष स्वप्नील पोतदार, महानगर अध्यक्ष युवराज खोडस्कार, प्रदेश सहमंत्री विक्रमजीत कलाने आदींच्या नेतृत्वात हल्लाबोल आंदोलन करण्यात आले. कुलगुरुंना विद्यार्थ्यांशी निगडीत ५७ मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले. विद्यापीठाच्या भोंगळ कारभारावर आक्षेप नोंदविताना पेपर सेटींग, मुल्यांकन, पुनर्मुल्यांकन, उशिरा लागणारा निकाल, निकालातील त्रृटी, पुनर्मुल्यांकन वेळेत न होणे, चुकीचे पुनर्मुल्यांकन होणे अशा विविध समस्या सोडविण्यासाठी अभाविपने अनेकदा निवेदन सादर केले आहेत. मात्र विद्यापीठाने विद्यार्थ्यांचे प्रश्न, समस्या सोडविण्यासाठी पुढाकार घेतला नसल्याचा आक्षेप नोंदविण्यात आला. यावर्षी विद्यार्थ्यांच्या निकाल लागण्यास सर्वाधिक वेळ १०० दिवसांहून अधिक दिवस लागले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाले आहे. यावेळी विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर अभाविपने आक्रमता दाखविली. अक्षय जोशी, अभिलाष खारोडे, अमित जोशी, जगदिश इंगोले, हरिदास शेंडे आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)
विद्यापीठात अभाविपचा हल्लाबोल
By admin | Published: September 30, 2016 12:25 AM