जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन, प्रशासनाला साथ देण्याचा धर्मगुरूंचा निर्धार
अमरावती : कोरोना संसर्गाचा झपाटा पाहता, प्रार्थनास्थळांसह सर्वच ठिकाणी गर्दी टाळणे अनिवार्य झाले आहे. त्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी शनिवारी विविध धर्माच्या प्रतिनिधींना केले. त्याला प्रतिसाद देत सर्वांनी कोरोनाविरुद्धच्या लढाईत प्रशासनाच्या प्रयत्नांना साथ देण्याचा निर्धार व्यक्त केला.
प्रार्थनास्थळी होणारी गर्दी टाळण्याबाबत विचारविनिमय करण्यासाठी विविध धर्माच्या प्रतिनिधींची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात झाली. सदर जमियत उलेमा-ए-हिंदचे हाफीज नाजिम अन्सारी, जामा मशीद समितीचे अध्यक्ष मोहम्मद शकील, साईबाबा ट्रस्टचे शरद दातेराव, श्री अंबादेवी संस्थानचे सचिव रवींद्र कर्वे, चर्चकडून फादर जोसलीन यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते.
धार्मिक कार्यक्रमांसाठी पाच व्यक्तींची मर्यादा घालून देण्यात आली आहे. तथापि, प्रार्थनेच्या वेळी मोठी गर्दी होते. ती टाळण्यासाठी सर्व धर्मप्रतिनिधींनी नागरिकांना घरीच राहून आरती, नमाज, प्रार्थना करण्याचे आवाहन करावे. धर्मप्रतिनिधींनी आवाहन केल्यास नागरिकांनाही त्याचे महत्व पटेल. प्रार्थनास्थळी ‘नो मास्क नो एन्ट्री’ हे धोरण राबवावे, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले.
कोरोनाची साखळी तोडणे ही सर्वांची जबाबदारी आहे. त्यामुळे आमच्याकडून यासाठी संपूर्ण सहकार्य मिळेल, असे सर्वांनी सांगितले.