फोटो पी १० गाविलगङ
कॅप्शन: गाविलगड किल्ला ऐतिहासिक असला तरी कोरोनाकाळात प्रवेशद्वाराआधीच काही अंतरावर तिकीटघर व फाटकाला असे टाळे लावून प्रवेश बंद करण्यात आला आहे.
पर्यटकांचे दुरूनच दर्शन :
नरेंद्र जावरे
चिखलदरा (अमरावती) : विदर्भाचे नंदनवन चिखलदरा स्थित गाविलगड किल्ल्याची दारे कोरोनाकाळात बंद आहेत. येथे येणाऱ्या पर्यटकांना दुरूनच या ऐतिहासिक वास्तूचे दर्शन घेऊन परत जावे लागत आहे.
गेली अनेक वर्षे भग्नावस्थेत असलेल्या या किल्याला नामशेष होण्यापासून वाचवण्याची धडपड सुरू आहे. अनेक वर्षांपासून त्याची डागडुजी सुरू आहे. गवळीगड ते गाविलगड अशी अनेक स्थित्यंतरे बघणाऱ्या या किल्ल्यात इतिहासकालीन स्मृती दडल्या आहेत. राजा महाराजांनी इतिहास लिहिला असला तरी गाविलगड किल्ल्याचे जतन करणे गरजेचे आहे.
ऐतिहासिक गाविलगड किल्ल्याला वर्षभरात हजारो पर्यटक भेट देतात. तरी पुरातत्त्व विभागाच्यावतीने आवश्यक त्या ऐतिहासिक नोंदी व माहिती देण्यासाठी कुठल्याही प्रकारचे शोधकार्य केले गेले नसल्याचे वास्तव आहे. किल्ल्याला गवळीगड ते गाविलगड असा इतिहास असून, बहमनी, इंग्रज, भोसले, मोगल, राजा बेनिसिंह अशा राज्यकर्त्यांनी वऱ्हाडची राजधानी असलेल्या या किल्ल्यावर राज्य केले. किल्ल्यात राजा बेनिसिंहसह अनेकांची समाधी आहे.
बॉक्स
कोरोनामुळे सर्वच बंद
चिखलदरा पर्यटनस्थळ, मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील जंगल सफारी तसेच प्रसिद्ध गाविलगड किल्ला आदी सर्वच बंद करण्यात आले आहे. तरीसुद्धा पर्यटक अड मार्गाने प्रवेश करीत असून, मोजके पॉईंट वगळता त्यांना परत जावे लागत असल्याचे चित्र आहे.
बॉक्स
ऐतिहासिक महत्त्व
बाराव्या शतकात गवळीगड असलेल्या गाविलगड किल्ल्याची मुहूर्तमेढ इ.स. १४२५ मध्ये बहमनी शासक अहमदशहा वली यांनी ठेवली. राज्यातील इतर किल्ल्यांपेक्षा सर्वाधिक मोठ्या तोफा गाविलगड किल्ल्यात आहेत. २५ फूट लांब व ३२ टन वजनाच्या तोफा दुर्लक्षित पडल्या आहेत. किल्ल्यातील अनेक लहान तोफा बेपत्ता झाल्या आहेत. गाविलगड किल्ल्यावरून हैदराबाद, अहमदनगर येथील पाथर्डी, माहूर व बैतूलच्या खेरला किल्ल्यावर नजर ठेवली जात होती. गाविलगड किल्ल्याच्या खालच्या भागात दारूगोळा बनवण्याचा कारखाना होता.
किल्ल्याला मछली, वीरभान, शार्दुल व दिल्ली असे दरवाजे असून, त्यावर अत्यंत कोरीव व महत्त्वपूर्ण अशी माहिती आहे. यावर पुरातत्त्व विभागाचे पूर्ण दुर्लक्ष असल्याने पर्यटकांना काहीच बोध होत नाही. किल्ल्यातील जुम्मा मशीद ही एकमेव वास्तू नामशेष होणाऱ्या गाविलगड किल्ल्याचे वैभव ठरत असून, त्याच्या दुरुस्तीची गरज आहे.