अचलपूर उपजिल्हा रुग्णालयात डॉक्टरची नियुक्ती करा, मनसेची मागणी
परतवाडा : अचलपूर उपजिल्हा रुग्णालयातील होमिओपॅथी विभाग सहा महिन्यांपासून बंद आहे. त्यामुळे येथे उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांची हेळसांड होत आहे. मनसेच्यावतीने उपजिल्हा रुग्णालयाच्या अधीक्षकांना निवेदन देऊन डॉक्टरांची नियुक्ती करण्याची मागणी करण्यात आली.
आयुर्वेदिक व होमिओपॅथी औषधांकडे रुग्णांचा वाढता कल पाहता शासनाने राष्ट्रीय आरोग्य ग्रामीण अभियान अंतर्गत उपजिल्हा रुग्णालयांच्या ठिकाणी होमिओपॅथिक डॉक्टरांच्या नियुत्या केल्या होत्या. अचलपूर उपजिल्हा रुग्णालयातून डॉ. शेजव हे सेवानिवृत्त झाल्यानंतर या पदावर नियुक्ती केली गेली नाही. त्यामुळे या विभागाला टाळे लागले आहे.
स्थानिक होमिओपॅथी डॉक्टरची नियुक्ती करून रुग्णांची होणारी गैरसोय टाळण्याच्या मागणीचे निवेदन मनसे जनहित कक्षाचे उपजिल्हाध्यक्ष विवेक महल्ले यांच्या नेतृत्वात निवेदन देण्यात आले. यावेळी रीतेश कोठाळे, अभय गोवारे, चेतन क्षीरसागर, शुभम मेहरे आदी उपस्थित होते.