वरूड बगाजी येथे एकदिवसीय तबलावादन संमेलन, गावात घडविले विद्यार्थी
फोटो -
गुरुमित्र निमकर/ मंगरूळ दस्तगीर : आपण तबला वादनात विशारद केले. मात्र, आपले मित्र दररोज पाच ते सहा तास मोबाईलवर गेम खेळतात. त्यांच्या आयुष्यात आपण बदल आणू शकतो, अशी मनात जिद्द बांधून त्याने मोबाईलवर चालणारे बोट तबल्यावर थाप मारण्यास बाध्य केले आहे. एकाच गावातील बारा चिमुकले उत्कृष्ट तबलावादक बनले आहेत. पेठ रघुनाथपूर येथील अश्विन काचरे यांनी तबला या विषयात ‘विशारद’ पदवी प्राप्त केली आहे. त्यांनी पंढरपूर व आळंदी येथे तबला वादनाचे प्रशिक्षण घेतले आहे. परंतु, कोरोना काळात त्यांना त्यांच्या गावी पेठ रघुनाथपूरला वापसी यावे लागले. याच कालावधीत कोरोना काळात शाळा बंद झाल्यामुळे लहान मुलांना मोबाईलचे खूप जास्त प्रमाणात वेड लागले, हे अश्विन कचरे यांच्या लक्षात आले. त्यावेळी त्यांनी आपल्या परिसरातील काही मुलांना एकत्रित करून त्यांना तबलावादन शिकविण्यास सुरुवात केली असता त्यांना उत्तम प्रतिसाद मिळाला. मग आपण शिकविलेले तबलावादन हे सर्व मुलांकडून एकत्रित वादन करून घ्यायची ही संकल्पना अश्विन कचरे यांच्या डोक्यात आली. त्यांनी एकदिवसीय तबलावादन संमेलनच आयोजित केले. ते संमेलन समाजमंदिर किंवा मंगल कार्यालय येथे न घेता निसर्गाच्या सान्निध्यात वरूड बगाजी येथील हेमंत देशमुख यांच्या शेतात घेतले. सतत दिवसभर तबला वादनाचा ब्रम्हनाद चालला. त्यामुळे मुलांना खूप जास्त प्रोत्साहन मिळाले. सोबतच सर्वांना भोजनाचा आस्वाद मिळाला. तबला वादनामध्ये तन्मय देशमुख (१३), वंश शिरभाते (११), राहुल चौके (१३), बाबू गावंडे (१४), दर्शन रोकडे (१०), कृष्णा महल्ले (९), युग डाफे (३), मयंक टारपे (१४), नैतिक निमकर (१०), तन्मय देवगडे (१०), भूषण कदम (२८), धनंजय मिठे (४०), अल्ताफ शाह (२४) यांनी सहभाग दिला.