लोकमत न्यूज नेटवर्कपरतवाडा : कांडली येथील दुहेरी हत्या प्रकरणात पोलिसांनी परिसरातील सर्व ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज तपासले आहेत तर मोबाईल कॉल डिटेल्सवरून संबंधितांचे बयाणदेखील नोंदविले. मात्र, अजूनपर्यंत कुठलाच सुगावा लागलेला नसून हत्या की, आत्महत्या, यावर शिक्कामोर्तब होण्यासाठी फॉरेन्सिक आणि शवविच्छेदन अहवालाची प्रतीक्षा केली जात आहे. अंजनगाव मार्गावरील येणी पांढरी येथील शेतशिवारात असलेल्या राकेश अग्रवाल यांच्या शेतातील शेत साहित्य ठेवण्याच्या शेडमध्ये बुधवारी सुधीर रामदास बोबडे ( ५२, रा. वनश्री कॉलनी कांडली) व ४८ वर्षीय महिलेचे रक्ताच्या थारोळ्यात मृतदेह आढळून आले होते. या घटनेने संपूर्ण जिल्ह्यात एकच खळबळ उडाली होती. घटनास्थळी महिलेच्या हातात चायना चाकू होता. पर्स मोबाईल व इतर साहित्य सुस्थितीत पडून होते. पोलिसांनी प्रथमदर्शी सुधीरने महिलेची हत्या करून स्वतः आत्महत्या केल्याचा प्रथमदर्शी कयास लावला होता; परंतु महिलेच्या फिर्यादीवरून अज्ञात आरोपीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानंतर जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ त्यांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन फॉरेन्सिक चमूला घटनास्थळी पाठवून पुरावे गोळा करायला सांगितले. शवविच्छेदन अहवालात कुठलीच हयगय होऊ नये, परिस्थितीजन्य पुरावे सर्व बाबींवर गांभीर्याने तपासणीचे आदेश स्वतः घटनास्थळी भेट देऊन दिले होते. अचलपूरचे उपविभागीय पोलीस अधिकारी गौहर हसन यांच्या नेतृत्वात तपास सुरू असून, परतवाडाचे ठाणेदार संतोष ताले व इतर अधिकाऱ्यांचा यात समावेश आहे.
कांडली अन् चिखलदरा स्टॉप सीसीटीव्हीत कैद पोलिसांनी विविध प्रकारे तपासाची दिशा ठरवित शहरातील प्रमुख मार्गांचे सर्व सीसीटीव्ही फुटेज गुरुवार-शुक्रवार दोन्ही दिवस तपासले. त्यामध्ये मृत महिला ज्या कापड दुकानात काम करत होती, तेथील सीसीटीव्ही फुटेजमध्ये ती पायी चिखलदरा स्टॉपपर्यंत जाताना कैद झाली, तर सुधीर बोबडे हा सांगली परिसरातील सीसीटीव्ही फुटेजमध्ये आढळून आला.
अहवालाची प्रतीक्षा दोन्ही मृतदेहाच्या शवविच्छेदन अहवालासोबतच फॉरेन्सिक टीमने घटनास्थळावरून गोळा केलेल्या बारीक नमुन्यांचा प्रयोगशाळेतील अहवाल त्यातून हत्या की, आत्महत्या, याचा खुलासा होणार आहे. घटनेपूर्वी गुंगीचे किंवा नशेचे औषध प्राशन केले का, या सर्व बाबींसाठी आता दोन्ही अहवालाची प्रतीक्षा पोलिसांनाही आहे.
मोबाईल सीडीआरवरून बयाण सुधीर बोबडे व मृत महिलेच्या मोबाइलचे लोकेशन आणि सर्वाधिक प्रमाणात मृत्यूपूर्वी काही दिवसांमध्ये संवाद साधला, त्या सर्वांचे बयान पोलिसांनी नोंदविले. त्यामध्येसुद्धा कुठेच काही आढळून आले नसल्याची माहिती आहे.