धामणगाव रेल्वे : राज्यातील ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या सुधारित वेतनात वाढ करण्याचा निर्णय शासनाने घेतला असला तरी अद्याप या निर्णयाची अंमलबजावणी जिल्ह्यात होत नसल्याने आक्रोश निर्माण झाला आहे.
ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या वेतनात सुधारित वाढ करण्याच्या संबंधाने किमान वेतन अधिनियम १९४८ अंतर्गत स्थानिक स्वराज्य संस्थांमधील कामधंदा या रोजगारात असलेल्या कामगारांना देय असलेले किमान वेतन मिळण्याबाबत अधिसूचना उद्योग, ऊर्जा व कामगार विभागाच्यावतीने १० ऑगस्ट २०२० रोजी प्रसिद्ध करण्यात आली आहे. राजपत्रानुसार परिमंडळनिहाय या कर्मचाऱ्यांना वर्गवारीनुसार किमान वेतनाचे दर पूर्ण निर्धारित करून निश्चित केले आहेत. अमरावती जिल्हा परिषदेने या निर्णयाची अंमलबजावणी करणे गरजेचे आहे. कोरोनाकाळात जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी इमानेइतबारे काम केले आहे. अनेक ग्रामपंचायतींनी या कर्मचाऱ्यांचे मागील अर्धेदेखील वेतन दिले नाही. याबाबत गटविकास अधिकारी माया वानखडे निवेदन देण्यात आले. यावेळी राज्य कर्मचारी महासंघ आयटकचे तालुकाध्यक्ष अमोल कांबळे, उपाध्यक्ष प्रवीण ठाकरे, सचिव शैलेश चापले उपस्थित होते.
-----