पथ्रोट : येथील गुजरी लाईनमध्ये काम नसतानाही दररोज नागरिकांची गर्दी असते. ‘ना फिजिकल डिस्टन्सिंग, ना मास्क, जनता मात्र बिनधास्त’ अशी परिस्थिती गुजरी लाईनमध्ये पाहायला मिळते. पोलिसांचे वाहन दिसले की, मास्क नाकावर, अन्यथा नाकाच्या खाली ही नित्याचीच बाब झाली आहे.
दिवसेंदिवस कोरोनाग्रस्तांमध्ये वाढ झाली. त्यामुळे मृत्युदरही दिवसेंदिवस फुगत चालला आहे. जनता मात्र शासनाचा आदेश धाब्यावर बसवून शासनालाच दोष देत सुटली आहे. पोलीस प्रशासनातर्फे सोशल डिस्टन्सिंग, मास्क, गर्दी करू नका अशा सूचना माईकद्वारे देऊन जनतेला जागरूक केले जात आहे. गाडीवर किंवा विनामास्कवाल्यांना दंड आकारणी केल्यास किंवा अडविल्यास पोलिसांना मारहाण केल्याच्या घटना घडल्या आहेत. याबाबत शासनाचे नियम धाब्यावर बसवून नागरिक बेफिकिरीने वागत आहेत.