ब्राह्मणवाडा थडी : स्थानिक पोलीस ठाण्याच्यावतीने २१ ऑगस्ट रोजी घाटलाडकी गावातील बाजार चौकात ऑनलाईन फसवणुकीबाबत जनजागृती करण्यात आली. कोरोनाकाळात इंटरनेटचा वापर प्रचंड वाढला आहे. शासनाच्यावतीने बँकिंग सेवांची डिजिटायझेशन, बँकिंग व्यवहार ऑनलाइन करण्याला प्राधान्य दिले जात आहे. या बाबीच्या अनुषंगाने ऑनलाइन व्यवहार करताना प्रत्येकाने सतर्क राहणे अत्यंत आवश्यक आहे. आपली ऑनलाइन फसवणूक होऊ नये, याकरिता अमरावती ग्रामीण पोलीस अधीक्षक हरी बालाजी एन. यांच्या मार्गदर्शनात ग्रामीण भागात सायबर क्राईम शाखेच्यावतीने जनजागृती अभियान राबविले जात आहे.
दाखल झालेल्या चित्रफितीच्या माध्यमातून या सायबर क्राईमपासून आपण कसे सुरक्षित राहू शकणार, यावर मार्गदर्शन करण्यात आले. सामान्य नागरिकांना बँक खाते गोठविले जाईल, एटीएम कार्ड बंद होईल, अशी बतावणी करीत लिंकवर क्लिक करण्यासाठी वामोबाईलवर बक्षिसांचे आमिष देऊन गोपनीय महिती प्राप्त करून आर्थिक फसवणूक केली जाते. आपला एटीएम पिन व ओटीपी कोणाला देऊ नये, अशा अनेक बाबींची जनजागृती या चित्रफितीतून करण्यात आली. यावेळी पोलीस निरीक्षक तपन कोल्हे, उपनिरीक्षक चौबे यांच्या मार्गदर्शनात पोलीस कॉन्स्टेबल पवन लवणकर, राजेंद्र कडू तसेच पोलीस शिपाई मुकेश निखरे, संदीप जुगनाके, सुनील धुर्वे यांनी नागरिकांना सायबर क्राईमबद्दल मार्गदर्शन केले.
यावेळी गावातील तसेच परिसरातील नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते.