पान ३ मस्ट
अमरावती, दि. २१ : बाललैंगिक अत्याचाराच्या घटना रोखण्यासाठी बालकांना योग्य व अयोग्य स्पर्शाची माहिती देणे, पालक व शिक्षक यांनी सजग राहून बालकांशी सुसंवाद ठेवणे आवश्यक असल्याचे पोलीस अधीक्षक हरी बालाजी एन. यांनी सांगितले.
याबाबत जारी केलेल्या व्हिडिओ संदेशात एसपी म्हणतात की, आपल्या अवतीभवती समाजात लैंगिक अत्याचाराच्या घटना दिवसेंदिवस वाढत असून, ही गंभीर समस्या आहे. सार्वजनिक ठिकाणीच नव्हे, तर अनेकदा परिचितांकडूनही अत्याचार घडतात. त्यात अल्पवयीनांवर बलात्कार, शरीराला घाणेरडा स्पर्श करणे किंवा अवयवाचा भाग नग्न करणे, तसे करण्यास भाग पाडणे, अश्लील व्हिडिओ दाखविणे किंवा तयार करणे, असे प्रकार घडतात. मुलांना अशा बाबींपासून सुरक्षित ठेवण्यासाठी त्यांच्यात जाणीवजागृती करणे आवश्यक असते. मुले एकलकोंडी होता कामा नयेत. त्यांचे मानसिक भावविश्व जपण्यासाठी त्यांच्याशी सुसंवाद ठेवला पाहिजे.
एखादी व्यक्ती घाणेरडे वर्तन करीत असेल तर त्याला वेळीच विरोध करण्याचा आत्मविश्वास बालकांमध्ये जागविला पाहिजे. अशा घटना झाल्यास किंवा तसे आढळल्यास पोलिसांना १०० किंवा चाइल्ड हेल्पलाइन १०९८ वर संपर्क साधण्याचे आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षकांनी केले आहे.
बॉक्स १
पालकांनी घ्यावयाची काळजी
विश्वास नसलेले ठिकाण किंवा व्यक्तीबरोबर तुमच्या मुलाला एकटे सोडू नका
बालकांशी संवाद ठेवा. त्यांच्या
वागण्या-बोलण्यात बदल जाणवला तर त्यांच्याशी लगेच बोला. त्यांचे म्हणणे शांतपणे ऐकून घ्या.
त्यांच्याबरोबर हिंसा किंवा लैंगिक शोषण झाल्यास त्यात त्यांची काहीही चूक नाही, हे बालकांना सांगा.
योग्य व अयोग्य स्पर्शाबाबत मुलांना मातेने माहिती द्यावी.