पान २ बॉटम
फोटो पी २४ चाके
मोर्शी : शहरातील रामजीबाबानगर येथील रहिवासी नागोराव चाके यांच्या कुटुंबातील चार जणांचा अवघ्या १७ दिवसांत मृत्यू झाला. घरातील वयोवृद्धांचा नैसर्गिक मृत्यू मानला जात असतानाच, साठीच्या आतील दोन मुलेही दगावली. पंधरवड्यातील या घटनेने शहरात खळबळ उडाली आहे.
रामजीबाबानगर येथील रहिवासी नागोराव दौलतराव चाके (९१) मोलमजुरी करून आपला प्रपंच चालवत होते. नागोराव यांना चार मुले, दोन मुली असून, सर्व जण विवाहित आहेत. दोन मुले मोर्शीला त्यांच्याजवळ राहतात, तर उर्वरित दोघे खेर्डा (ता. कारंजा लाड) व पुणे येथे राहतात. २५ एप्रिल रोजी नागोराव चाके यांचा आकस्मिक मृत्यू झाला. अवघ्या सात दिवसांत म्हणजेच २ मे रोजी त्यांच्या पत्नी कमलाबाई (८१) या अल्पशा आजाराने निर्वतल्या. हे दाम्पत्य वयोवृद्ध असल्याने व त्यांना कुठल्याही प्रकारचा आजार नसल्याने त्यांचा मृत्यू हा नैसर्गिक असल्याचे गृहीत धरून परिवारातील लोकांनी त्यांचे सर्व सोपस्कार पार पाडले. मात्र, त्याचवेळी मुलगा दशरथ (५०) हासुद्धा आजारी पडला. त्यांच्यावर अमरावती येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू होते. आईच्या निधनानंतर अवघ्या सात दिवसांच्या अंतराने ९ मे रोजी दशरथ यांचे जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार घेत असतानाच निधन झाले. खेर्डा येराहणारे नागोराव चाके यांचे द्वितीय चिरंजीव मनोहर (५२) हे कोरोना संक्रमित होऊन अमरावती येथील एका खासगी रुग्णालयात उपचार घेत होता. अवघ्या चार दिवसांतच १३ मे रोजी मनोहरचा मृत्यू झाला. दशरथ तसेच मनोहर या दोन्ही कर्त्या माणसांच्या मृत्यूने दोन्ही कुुटुंबांसमोर उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे.
चाके कुटुंबीय या घटनेने अतिशय हादरले असून, मानसिक आधाराची गरज असताना परिसरातील लोक त्यांच्या संपर्कात येण्यासाठीसुद्धा घाबरत आहेत. मृत दशरथ यांच्या पश्चात पत्नी, विवाहित व अविवाहित मुलगी (१८) व मुलगा (९) असा आप्तपरिवार आहे. त्यांना शासकीय मदत मिळावी, अशी मागणीसुद्धा मोर्शीकर नागरिक करीत आहेत.