प्रकाश साबळे यांची तक्रार : हिरवेगार वृक्ष वाचविण्याचे आर्जवअमरावती : राज्यमार्गावरील हिरवेगार वृक्षांच्या बुंध्यांशी आग लाऊन कत्तली होत असल्याप्रकरणी सार्वजनिक बांधकाम विभाग जबाबदार असल्याचा आरोप जिल्हा परिषदेचे सदस्य प्रकाश साबळे यांनी केला आहे. हिरवेगार वृक्ष वाचविण्यासाठीची आर्जव कार्यकारी अभियंत्याकडे तक्रारीद्वारे करण्यात आली आहे.वलगाव- चांदूरबाजार राज्यमार्गावर झाडाच्या बुंध्याशी आग लावून अवैध वृक्षतोड केल्या जात असल्याचे सचित्र वृत्त मंगळवारी ‘लोकमत’मध्ये प्रकाशीत झाले. या वृत्ताचीे दखल घेत जि.प. सदस्य प्रकाश साबळे यांनी बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता संतोष जाधव यांना तक्रार देऊन बिट्रीशकालीन झाडे वाचविण्याची मागणी करण्यात आली. शहरालगत वलगाव-चांदूरबाजार, अमरावती- परतवाडा, अमरावती- दर्यापूर या राज्य मार्गावरील हिरवेगार वृक्षांना बुंध्यांशी आगी लाऊन ते नष्ट केले जात आहे. खरे तर राज्य मार्गावरील झाडांचे जतन करण्याची जबाबदारी ही सार्वजनिक बांधकाम विभागाची आहे; तथापि शेकडो वृक्षांच्या बुंध्यांशी आग लाऊन लाकूड तस्करी केली जात आहे. मात्र बांधकाम विभागाने एकाही अभियंत्यांवर जबाबदारी निश्चित करुन कारवाई केली नाही, असा आरोप साबळे यांनी केला आहे. सातत्याने राज्यमार्गावरील हिरवेगार वृक्ष नष्ट होण्यामागे बांधकाम विभागाच जबाबदार आहे. राज्य मार्गावरील किती हिरव्यागार झाडांना आग लाऊन ते नष्ट करण्यात आले, याची माहिती देखील बांधकाम विभागाकडे नसल्याचे प्रकाश साबळे यांचे म्हणणे आहे. राज्य मार्गालगतच्या हिरवेगार झाडांची कत्तल करुन होणाऱ्या लाकूड तस्करीत बांधकाम विभागाचे अधिकारी तर सहभागी नाहीत, असा सवाल प्रकाश साबळे यांनी उपस्थित केला आहे. झाडांच्या बुंध्यांशी आग लाऊन ते नष्ट करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
झाडांच्या कत्तलीसाठी ‘बी अॅन्ड सी’ जबाबदार
By admin | Published: April 20, 2017 12:10 AM