लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : ‘थँक्यू वर्ल्ड फॉर युवर लव्ह ॲन्ड काईंडनेस’ असे लिहून त्याखाली ‘माझ्या बाबाला आम्ही नको आहे, आता बस झाला त्रास’ अशा दोन ओळी लिहित सॉफ्टवेअर अभियंता असलेल्या २४ वर्षीय तरुणीने पंख्याला ओढणी बांधत त्याचा फास आवळला. त्याचवेळी सहायक शिक्षक असलेल्या तिच्या आईनेदेखील साडीचा पदर गळ्यात अडकवत स्टूलहून खाली उडी घेतली. क्षणात दोघींचे प्राणपाखरू उडाले. दिवाळीच्या दिवशी अख्खा देश प्रकाशात न्हाऊन निघाला असताना त्या माय-लेकीने लक्ष्मीपूजनाच्या आधीच आत्मघाताचा टोकाचा निर्णय घेतला.शिक्षक सन्मती कॉलनी येथील उच्चभ्रू अशा वानखडे कुटुंबातील सुुवर्णा व मृणाल या माय-लेकीचे मृतदेह मंगळवारी रात्रीच्या सुमारास गळफास घेतलेल्या स्थितीत आढळून आले. पोलिसांनी घटनास्थळाहून मृणालने लिहिलेली सुसाईड नोट जप्त केली. ती सुसाईड नोट व सुवर्णा यांचे बंधू डॉ. विजय आखरे यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी सुवर्णाचे पती तथा मृणालचे वडील प्रदीप वानखडे याला अटक केली. टोकाच्या कौटुंबिक वादाची अखेर दोघींच्या मृत्यूने झाली. पुण्यातील एका जगप्रसिद्ध कंपनीत सॉफ्टवेअर इंजिनिअर असलेली व सध्या ‘वर्क फ्रॅाम होम’ कार्यरत मृणाल व राठीनगरातील एका शिक्षण संस्थेत सहायक शिक्षक असलेल्या सुवर्णा यांच्या मृत्यूने अनेक अनाकलनीय प्रश्नांची मालिका निर्माण झाली आहे. प्रदीप वानखडे याच्याविरुद्ध कौटुंबिक छळ व आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला.‘अंतिम संस्कार आखरे परिवार करणार’बाबाला आम्ही नको आहे. आता बस झाला त्रास, असे लिहून मृणालने पित्याविषयीची खंत कागदावर चितारली. अंत्यसंस्कार मामा असलेले आखरे परिवार करणार, असेही मृणालने म्हटले. त्यानुसार, बुधवारी दुपारपूर्वी दोघींच्या शवविच्छेदनानंतर आखरे व त्यांच्या कुटुंबीयांनी बहीण व भाचीच्या पार्थिवावर जड अंत:करणाने अंत्यसंस्कार केले.
काय आहे तक्रारीत?
प्रदीप वानखडे हे घाटंजी तालुक्यातील चांदापूर स्थित आश्रमशाळेचे मुख्याध्यापक आहेत. ते पत्नी सुवर्णा व मुलगी मृणाल हिच्यासमवेत अमरावतीत शिक्षक सन्मती कॉलनीतील घरात राहत होते. अलीकडे प्रदीप यांनी पत्नीला त्रास देणे सुरू केले. त्याचा मृणालही त्रास होत होता. अलीकडे त्यांनी अमरावतीतील घरी ये-जादेखील बंद केली. प्रदीप हे टॉर्चर करीत असल्याबाबत सुवर्णा यांनी दिवाळीच्या दिवशी भाऊ विजय आखरे यांना कळविले होते. तू व तुझी मुलगी मला आवडत नाही, मी दोघींनाही जगू देणार नाही, असे प्रदीप हे आपणास म्हणत असल्याचे सुवर्णा यांनी भावाला सांगितले होते. २४ ऑक्टोबर रोजी सकाळी १०.४५ च्या सुमारास माय-लेेकीने विजय आखरे यांना कॉल केला होता.
पूजा मांडण्यापूर्वी अंतिम प्रवासाकडे कूचदिवाळीच्या दिवशी आत्महत्यापूर्वी मायलेकींनी देव्हाऱ्यासमोर लक्ष्मीपूजनाची तयारी केली. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला तेव्हा हे स्पष्ट झाले. पूजेसाठी चौरंग ठेवला होता. दुसऱ्या चौरंगाला आंब्याची पाने लावली, तर बाजूलाच हार करण्यासाठी फुले व सुई-दोरा आढळून आला. फटाके व दिवाळी पूजनाचे अन्य साहित्यदेखील आणण्यात आले. किचनमध्ये स्वयंपाकाची तयारीदेखील करण्यात आली. मात्र, त्यापूर्वीच मायलेकीने गळफास लावला. सूत्रानुसार, प्रदीप वानखडे हे दिवाळीच्या दिवशी दुपारनंतर घराबाहेर पडले. त्यानंतर सोमवारी रात्री कधीतरी दोघीनींही आत्मघात केला.