- सुदेश मोरे सुर्जी (अमरावती) : महानायक अमिताभ बच्चन यांच्यापुढे ४८०० जणांमधून ‘कौन बनेगा करोडपती’ कार्यक्रमात हॉट सीटवर बसून एक कोटी रुपये जिंकणाऱ्या अंजनगावच्या बबिता ताडे यांच्या कर्तृत्वामुळे अमरावती जिल्ह्याची मान देशभरात अभिमानाने उंचावली आहे. बबिता ताडे यांचे शिक्षण बी.ए.पर्यंत झाले. स्पर्धा परीक्षा देण्याची विद्यार्थीदशेतील इच्छा आणि आतापर्यंत सुरू असलेले सातत्यपूर्ण वाचन यामुळे त्यांचे सामान्य ज्ञान समृद्ध होत गेले. केबीसीचा मंच त्यांनी याच ज्ञानाच्या जोरावर जिंकला. बबिता यांचे पती सुभाष ताडे हे हरणे विद्यालयातच शिपाई या पदावर कार्यरत आहेत. मुलगी पुणे येथे उच्चशिक्षण घेत आहे तर मुलगा अंजनगावात शिक्षण घेतो आहे.४०० मुलांची खिचडी शिजविण्याच्या मोबदल्यात अवघे १५०० रुपये मिळतात. असे असले तरी चिमुकल्यांना भरविण्यात मिळणारा आनंद अद्वितीय आहे आणि इथून पुढेही मी खिचडी शिजविण्याचे काम सुरूच ठेवणार, अशी भावना बबिता यांनी बोलून दाखविली.पतीला बाइक घेऊन देणार!‘‘केबीसीत एक कोटी रुपये जिंकण्याचे श्रेय पतीला देईन, असे बबिता म्हणाल्या. त्यांनी मला शिक्षण, अभ्यासापासून थांबविले नाही. आम्ही परस्परांच्या कामांचा आदर करतो. आता मिळालेल्या एक कोटी रुपयांमधून अंजनगावातील एका छोट्या शिवमंदिराची पुनर्बांधणी करायची आहे. मुलांचे उच्चशिक्षण आणि पतीला नवी बाइक घेऊन द्यायची आहे. आणि हो, खिचडी शिजविण्याचे काम सुरूच ठेवायचे आहे,’’ असे बबिता यांनी सांगितले.
KBC 11 : करोडपती बबिता म्हणतात, ‘मुलांना खिचडी भरवतच राहणार!’
By ऑनलाइन लोकमत | Published: September 21, 2019 6:01 AM