परतवाडा (अमरावती) : बहिरम यात्रेत आयोजित शंकरपटात तीन दिवसांमध्ये एकूण १७८ बैलजोड्या सुटल्या. गावगाडा गटात अचलपूर व चांदूरबाजार तालुक्यातील ६५, तर जनरल गटात मध्य प्रदेशसह राज्यातील ११३ जोड्या धावल्या.
शंकरपटाच्या अखेरच्या दिवशी संदीप चव्हाण (रा. हिवरखेड पूर्णा, जि. बुलढाणा) यांच्या बब्या-मल्हार नामक बैलजोडीने वायुवेगाने ६.०२ सेकंदात अंतर कापत जनरल गटात पहिला क्रमांक पटकावला. या जोडीचा धुरकरी विलास नवघरे हा हंगामा पुरस्काराचा मानकरी ठरला. वयाच्या तेराव्या वर्षापासून विलास शंकरपटांमध्ये बैलजोडी हाकत आहे. गोरेगाव (जि. अकोला) येथील गजानन शेगावकर यांच्या गुरू-सिंघम व मध्य प्रदेशातील राठामाटी येथील टिकली-टिकली या जोडीने ६.५ सेकंदात अंतर कापत दुसरा क्रमांक पटकाविला. बैतूल येथील रामप्रसाद राठोड यांच्या किंग-पुष्पराज या बैलजोडीने ६.८ सेकंदात अंतर कापून तिसरा क्रमांक पटकावला. या गटात राज्यासह राज्याबाहेरील बैल जोड्या धावल्यात.
गावगाडा गटात भैयासाहेब ठाकरे यांच्या पिंट्या-बंट्या नामक जोडीने ६.५२ सेकंदात अंतर कापत प्रथम क्रमांक पटकाविला. एकलासपूर येथील दिलीप डहाके यांच्या बैलजोडीने ६.५८ सेकंदात अंतर कापत दुसरा क्रमांक पटकाविला. बेलज येथील विलास बुरघाटे यांच्या प्रसाद-रॉकेट आणि सर्फापूर येथील संदीप घुलक्षे यांच्या चेंडू-तुफान या बैल जोड्यांनी ६.६५ सेकंदात बरोबरीत अंतर कापून तिसरा क्रमांक पटकाविला.