करजगाव (अमरावती) : रविवारच्या रात्री खरपी बहिरम रस्त्यावर दुचाकी व चारचाकीमध्ये भीषण अपघात झाला. यात सहा तरुणांचा जागीच मृत्यू झाला. अपघात इतका जबरदस्त होता की, चारचाकी व दुचाकी क्षतिग्रस्त झाल्या. या अपघातात मृत्युमुखी पडलेल्या तरुणाच्या घरी जाऊन आमदार बच्चू कडू यांनी सांत्वन भेट घेतली व परिवाराच्या समस्या जाणून घेतल्या.
आमदार कडू यांनी झालेला घटनाक्रम जाणून घेतला. हा क्षण अत्यंत मन हेलावून टाकणारा होता. काळजाचा तुकडा गमाविला आता पैशाचे काय करायचे. कमावती मुले गेलीत. जीवनाचा आधार काळाच्या पडद्याआड गेला. आता जगायचे कसे अशा भावना आई-वडील व परिवारातील सदस्यांनी व्यक्त केल्या. काळाने घातलेल्या घाल्याने सहा तरुणांच्या गावी जाऊन त्यांच्या कुटुंबीयांना तत्काळ आर्थिक मदत म्हणून ५० हजार रुपये आमदार कडू यांनी दिले.
मुख्यमंत्री सहाय्यता निधीमधून ५ ते ६ लाख रुपये देण्याचे प्रयत्न करणार असल्याची बच्चू कडू यांनी ‘लोकमत’ला माहिती दिली. यावेळी बोदड येथील पांडुरंग रघुनाथ शनवारे, सतीश सुखदेव शनवारे (रा. बहिरम), सुरेश विठ्ठल निर्मळे (रा. खरपी), चालक रमेश धुर्वे (रा. सालेपूर), दुचाकी चालक प्रतीक दिनेशराव मांडवकर, अक्षय सुभाष देशकर (दोन्ही २६ रा. बोदड ) यांच्या घरी भेट दिली.