गजानन चोपडे
अमरावती : आपण आधीही एकनाथ शिंदेंसोबत सत्तेत सहभागी झालो होतो आणि आताही त्यांच्यासोबतच आहे. माझा कुणालाही वैयक्तिक विरोध नाही; पण या सरकारमध्ये कुठेही ताळमेळ नसल्याचा पदोपदी अनुभव आला. आपण स्वत: मुख्यमंत्र्यांना फोन करून शिंदेंसोबत असल्याची माहिती दिली. त्यांनी नाराजीही व्यक्त केली, मात्र तोपर्यंत पाणी डोक्यावरून निघून गेले होते. त्यामुळे आपण हा निर्णय घेतल्याचे सांगत प्रहार जनशक्ती पक्षाचे प्रमुख राज्यमंत्री बच्चू कडू यांनी गुवाहाटीहून लोकमतशी संवाद साधला.
मंगळवारी बच्चू कडू पुण्याहून मुंबईला पोहोचले तेव्हापर्यंत ते ‘वेट ॲण्ड वॉच’च्या भूमिकेत होते. परंतु अचानक रात्री त्यांनी सुरत गाठले. मेळघाटचे आमदार राजकुमार पटेलही त्यांच्यासोबत शिंदे यांच्या कॅम्पमध्ये सामील झाले. आपण आधीपासूनच एकनाथ शिंदे यांच्यासोबत असल्याने आपण हा निर्णय घेतल्याचे ते म्हणाले. मुख्यमंत्री शिवसेनेच्याच आमदारांना वेळ देत नसल्याचा पाढाही कडू यांनी वाचला. पक्षातील आमदारांचीच कामे होत नसतील तर इतरांची काय अवस्था असेल, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
मंत्र्यांचीच कामे होत नव्हती, विकासकामांसाठी निधी मिळत नव्हता. त्यामुळे हा असंतोष वाढत गेला आणि त्याचे पर्यवसान आमदारांच्या बंडखोरीत झाले. सध्या एकनाथ शिंदे यांच्यासोबत अपक्षांसह ४० आमदार आहेत. ही संख्या लवकरच ५०च्या घरात जाणार असल्याचा दावाही बच्चू कडू यांनी केला आहे. वेगळा गट स्थापन करण्याची प्रक्रियादेखील सुरू झाल्याचे त्यांनी सांगितले.
बंडाळीनंतर यवतमाळातील शिवसैनिक संभ्रमात
सेनेत उभी फूट पडल्याने महाविकास आघाडी सरकार अडचणीत आले आहे. यवतमाळचे पालकमंत्री संदिपान भूमरे हे बंडखोरांच्या गटात सामील झाले आहेत. तर दुसरीकडे शिवसेनेचे स्थानिक नेते आमदार संजय राठोड यांची भूमिका अद्याप स्पष्ट नसल्याने जिल्ह्यातील शिवसैनिक संभ्रमात असल्याचे चित्र आहे. मंगळवारी संजय राठोड हे बंडखोरांच्या गटात सहभागी झाल्याच्या बातम्या वाहिन्यांवरून प्रसारित होत होत्या. मात्र राठोड यांनी सायंकाळी वर्षा बंगल्यावर झालेल्या बैठकीला उपस्थिती लावली. बुधवारी सकाळी संजय राठोड गुवाहाटीकडे रवाना झाल्याच्या वार्ता आल्या. मात्र दुपारी एकनाथ शिंदे यांनी जाहीर केलेल्या समर्थक आमदारांच्या यादीत संजय राठोड यांचे नाव नसल्याने त्यांच्या भूमिकेबाबत संभ्रम आहे.