गेल्या काही दिवसापासून प्रहार संघटनेचे नेते आमदार बच्चू कडू आणि आमदार रवी राणा यांच्यात आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. आता बच्चू कडू यांनी अमरावती लोकसभा मतदार संघावर दावा केला आहे. आम्ही भाजपकडे या मतदार संघाची मागणी करु, नाही दिला तर स्वतत्रपणे उमेदवार देऊ असं वक्तव्य बच्चू कडू यांनी केलं आहे. यामुळे राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. आता पुन्हा एकदा राणा दाम्पत्य आणि आमदार बच्चू कडू यांच्यात आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी सुरू झाल्या आहेत.
अमरावती लोकसभा मतदारसंघात प्रहारकडून रवींद्र वैद्य संभाव्य उमेदवार असल्याची चर्चा सध्या जोरदार सुरू आहे. यासाठी आता प्रहारने जोरदार तयारी सुरू केली आहे. या उमेदवारी संदर्भात वैद्य यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
दरम्यान, आता प्रहार संघटनेचे रवींद्र वैद्य यांनी उमेदवारीची इच्छा व्यक्त केली आहे. रवींद्र वैद्य म्हणाले, प्रहार पक्षाने जर मला अमरावती लोकसभेची जर उमेदवारी दिली तर मी लोकसभा लढवणार आहे. हा मतदार संघ राखीव आहे, विद्यमान खासदार या शेड्युल कास्टच्या नाहीत. त्यांच्याकडे खोट जातीच प्रमाणपत्र आहे. त्यामुळे त्या या ठिकाणी शेड्युल कास्टच्या उमेदवाराच्या हक्कावर डल्ला मारुन खासदारकी उपभोगत आहेत. मला जर उमेदवारी दिली तर इथली जनता माझ्या पाठिमागे उभे राहतील, असंही वैद्य म्हणाले.
"विद्यमान खासदारांनी आतापर्यंत येथील लोकांसाठी काहीच काम केलेलं नाही. ज्या जनतेने त्यांना निवडून दिलं त्यांचा त्यांनी अपमान केला आहे. जनतेच्या भावनेसाठी माझी ही तयारी आहे. बच्चू कडूंनी जर संधी दिली तर मी त्या संधीच सोनं करेन, असंही रवींद्र वैद्य म्हणाले.