Bacchu Kadu ( Marathi News ) : अमरावती लोकसभा मतदारसंघात महायुतीचा घटकपक्ष असलेल्या प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते आमदार बच्चू कडू यांनी महायुतीच्या उमेदवार नवनीत राणा यांच्याविरोधात आक्रमक भूमिका घेत आपल्या पक्षाचाही उमेदवार मैदानात उतरवला आहे. गेल्या काही दिवसांत बच्चू कडू आणि नवनीत राणा यांच्यात शाब्दिक वाद सुरू असतानाच आज मात्र सायन्स कोअर मैदानातील सभेवरून चांगलाच राडा झाला. आधी परवानगी मिळाल्यानंतरही आता मात्र भाजप नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या सभेचं कारण सांगत पोलीस आम्हाला मैदानात सभा घेऊन देत नसल्याचा आरोप करत बच्चू कडू यांनी पोलीस प्रशासनाविरोधात आक्रमक भूमिका घेतली. यावेळी बच्चू कडू यांना राग अनावर झाला होता.
बच्चू कडू यांनी मैदानावर उपस्थित असणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यावर आधी प्रश्नांची सरबत्ती केली आणि नंतर त्यांचे पायही पकडले. तसंच कडू यांनी त्यांच्याशेजारी उभ्या असणाऱ्या एका व्यक्तीला मारहाण केली. हा व्यक्ती कोण होता, हे स्पष्ट होऊ शकलं नाही.
नेमका वाद काय आहे?
अमरावतीतील महायुतीच्या उमेदवार नवनीत राणा यांच्या प्रचारार्थ बुधवार २४ एप्रिल रोजी देशाचे गृहमंत्री अमित शहा यांची सायन्स कोअर मैदानावर सभेचे आयोजन करण्यात आले आहे. मात्र, २३ व २४ एप्रिल रोजी हे मैदान प्रहारचे आमदार बच्चू कडू यांच्या उमेदवारांच्या नावे बुकिंग आहे. अस मात्र पोलीस प्रशासनाने सुरक्षेच्या कारणांनी प्रहार आमदार बच्चू कडू, उमेदवार दिनेश बुब यांना मंगळवारी मैदानाचा ताबा घेण्यास मज्जाव केला. त्यामुळे आमदार बच्चू कडू आणि पोलिस उपायुक्त गणेश शिंदे यांच्यात चांगलीच जुंपली.
"पोलीस अधिकारी भाजपच्या इशाऱ्यावर नाचत आहेत"
आमदार बच्चू कडू यांनी पोलीस प्रशासन हे भाजपच्या इशाऱ्यावर नाचत असल्याचा आरोप केला आहे. बुधवारी २४ एप्रिल रोजी सायन्स कोअर मैदानावर प्रहार उमेदवारांची सभा आणि रॅली घेणार असल्याची दावा त्यांनी केला. आमच्याकडे मैदानाची अधिकृत परवानगी असताना कायदा व सुव्यवस्था तोडण्याचे काम पोलीस करीत आहे. भाजपचे उमेदवार नवनीत राणा यांच्याकडे या मैदानाची परवानगी नसताना गृहमंत्री शहा यांची कशी सभा घेण्यास पोलीस प्रशासन सहकार्य करीत आहे, असा असा सवाल कडू यांनी केला.