लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : जिल्हा परिषदेमार्फत अपंगांसाठी राबविण्यात येणाऱ्या योजनांचा इतर विकासात्मक कामांचा आ. बच्चू कडू यांनी सोमवारी मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा खत्री यांच्या दालनात आढावा घेतला.आमदार कडू यांनी यावेळी राज्य व जिल्हा परिषदेच्या निधीतून अपंगांसाठी राखीव तीन टक्के निधीचा लेखाजोखा अधिकाऱ्यांकडूृन जाणून घेतला. अपंगांसाठीच्या घरकुल योजनेचा आढावा घेत, जिल्हाभरातील अपंगांसाठी मंजूर घरकुले, प्रगतिपथावरील घरकुले तसेच रखडलेल्या घरकुलाची माहिती जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक के.एम. अहमद यांच्याकडून घेतली. यासोबतच पंडित दीनदयाल उपाध्याय योजनेचा आढावा स्वच्छ भारत मिशन अंतर्गत शौचालय बांधकामाचा वितरित निधी वाटपाचा आढावा घेऊन रखडलेल्या लाभार्थ्यांना त्वरित अनुदान वाटपा करण्याची सृचना त्यांनी दिली. जनसुविधा अंतर्गत प्रस्तावित कामे, मंजूर कामे, प्रलंबित कामे, ३०-५४ मधील प्रस्ताव, मंजूर कामे, प्रलंबित कामे, तीर्थक्षेत्र विकास अंतर्गत प्रस्तावित कामे, प्राथमिक केंद्र ब्राह्मणवाडा थडी इमारत बांधकाम, जागा खरेदी करण्यासाठी निधी उपलब्ध करून द्यावा, नवीन मंजूर प्राथमिक आरोग्य दहिगाव पुर्णा येथे इमारत बांधकामाकरिता निधी उपलब्ध करून देणे, घाटलाडकी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारतीकरिता कार्यारंभ आदेश देण्यात यावा आदी विविध मुद्द्यांवर आ. कडू यांनी सीईओ मनीषा खात्री यांच्याशी चर्चा करून तातडीने कारवाई करण्याची सूचना केली. यावेळी बैठकीला प्रहारचे पदाधिकारी छोटू महाराज वसू, मनोज जैस्वाल, चंदू खेडकर, जोगेंद्र मोहोळ यांच्यासह अन्य पदाधिकारी तसेच जिल्हा परिषदेच्या विविध विभागांचे खातेप्रमुख उपस्थित होते.