अमरावती : महायुतीचे घटक पक्ष असलेल्या प्रहार जनशक्ती पक्षाचे आमदार बच्चू कडू यांनी खासदार नवनीत राणांचा प्रचार करणार नाही. प्रहार पक्षाच्या कार्यकर्त्यांची तशी भावना आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना वस्तुस्थिती सांगितली आहे. प्रसंगी महायुतीतून बाहेर पडू पण राणांसाठी मत मागणार नाही, अशी रोखठोक भूमिका गत काही दिवसांपूर्वी बच्चू कडू यांनी मांडली होती. अखेर शुक्रवारी महायुतीला धक्का देत प्रहार पक्षाकडून दिनेश बुब यांना उमेदवारी जाहीर केल्यामुळे महायुतीतील विसंवाद चव्हाट्यावर आला आहे.
भाजपने नवनीत राणा यांना अमरावतीची उमेदवारी जाहीर करताच आमदार बच्चू कडू यांनी कमालीची नाराजी प्रसारमाध्यमांशी बोलताना स्पष्ट केली होती. महायुतीचे घटक असलो तरी लाचारी पत्करणार नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत दिव्यांगाच्या भल्यासाठी गेलो आहे. मात्र गत काही वर्षात आमदार रवी राणा, खासदार नवनीत राणा यांची वागणूक ही अपमानास्पद राहिली आहे. आम्ही कोणाचे काहीही ऐकूण घेणारे नाही. स्वाभिमान अद्यापही गहाण ठेवला नाही. त्यामुळे काहीही झाले तरी नवनीत राणा यांचा प्रचार करणार नाही, अशी भूमिका आमदार बच्चू कडू यांनी घेतली होती. या भूमिकेशी सुसंगत राहण्यासाठी प्रहार पक्षाचे नेते आमदार राजकुमार पटेल, बल्लू जवंजाळ, माजी नगराध्यक्ष अब्दूल रहेमान यांच्या उपस्थितीत शुक्रवारी आयोजित पत्रपरिषदेत शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे माजी नगरसेवक दिनेश बुब यांना प्रहार पक्षाच्यावतीने उमेदवारी जाहीर करण्यात आली.राजकुमार पटेल यांनी केली बुब यांच्या नावाची घोषणापत्रपरिषदेत प्रहारचे आमदार राजकुमार पटेल म्हणाले की प्रहारच्या कार्यकर्त्यांची बैठक झाली. अमरावतीत संघटनेने उमेदवार द्यावा, अशी मागणी कार्यकर्त्यांनी केली. माझ्यावर बच्चू कडूंनी जबाबदारी सोपविली. अमरावतीत मैत्रीपूर्ण लढण्याचा आम्ही निर्णय घेतला आहे. दिनेश बुब यांनी निवडणुकीत उभे राहण्याचा निर्णय घेतला. अमरावती लोकसभा मतदारसंघातून प्रहारचे उमेदवार बुब असतील अशी घोषणा आमदार पटेल यांनी यावेळी केली.प्रहारचे दोन आमदार, एक लोकसभेची जागा मागितलीदिनेश बूब हे इच्छुक उमेदवार होते. शिवसेना ठाकरे गटाने ही जागा काँग्रेसला दिली. दिनेश बुब यांना प्रहारचे उमेदवार म्हणून मैदानात उतरवत आहे. अमरावती जिल्ह्यात प्रहारचे दोन आमदार आहेत. आम्हाला लोकसभेची एक जागा हवी होती. महायुतीत आम्ही एक जागा मागितली तर चुकीचे काय? पक्ष वाढावा असे सगळ्यांनाच वाटते, असे आमदार राजकुमार पटेल म्हणाले.माझ्यासमोर दोन उमेदवार असून ते विद्यमान लोकप्रतिनिधी आहेत. सरकारी पैशातून श्रेयवादाचे बॅनर्स लावणे हे मला पटत नाही. मी आतापर्यंत कोटींची विकास कामे केले, पण कुठेही माझ्या नावाचा फलक लावला नाही. विकासकामे होत राहतील पण समाजा-समाजामध्ये दरी निर्माण होत आहे. ही दरी दूर करण्यासाठी लोकसभा निवडणूक रिंगणात आहे.- दिनेश बुब, प्रहारचे उमेदवार