अमरावती : शहरातील एका महाविद्यालयातील क्रीडा शिक्षकाने अल्पवयीन विद्यार्थिनीला एकमेकांची मसाज करू, असे म्हणून तिचा विनयभंग केला. तिला पैसे देण्याचे आमिषसुद्धा दाखविले. ही घटना मंगळवार, २६ सप्टेंबर रोजी गाडगेनगर ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आली. या प्रकरणी शिक्षकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विश्वास जाधव (५०) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. विश्वास जाधव हा शहरातील एका महाविद्यालयात क्रीडा शिक्षक म्हणून कार्यरत आहे. त्याने महाविद्यालयातीलच एका १७ वर्षीय विद्यार्थिनीला मोबाइलवर कॉल करून क्रीडा विभागात बोलाविले. त्यानंतर त्याने तिला एका सेंटरवर आपण एकमेकांची मसाज करू, असे म्हटले. त्याकडे दुर्लक्ष करीत पीडित विद्यार्थिनी तेथून निघून गेली.
दरम्यान, क्रीडा शिक्षक विश्वास जाधव हा अन्य विद्यार्थिनींना बॅड टच करीत असल्याचे तिला समजले. त्यामुळे पीडित विद्यार्थिनी ही त्याच्यापासून दूर राहू लागली. त्यानंतरही विश्वास जाधव हा त्याच विषयावरून पीडित विद्यार्थिनीला वारंवार बोलत होता. त्याने तिला पैशांचे आमिषसुद्धा दाखविले. शिक्षक विश्वास जाधव याच्या या सततच्या त्रासाला कंटाळून विद्यार्थिनीने अखेर गाडगेनगर ठाण्यात तक्रार दाखल केली. तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी विश्वास जाधवविरुद्ध विनयभंग, बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा व ॲट्रॉसिटी कायद्यान्वये गुन्हा दाखल केला. सायंकाळी उशिरा पोलिसांनी आरोपीला अटक करण्यात आली.
पीडितेच्या तक्रारीवरून विनयभंग, पॉक्सो आणि अॅट्रॉसिटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीला अटक करण्यात आली आहे. पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहेत.
- गजानन गुल्हाने, पोलिस निरीक्षक, गाडगेनगर पोलिस ठाणे