सहभाग : ड्रायझोन कमी होण्याचा विश्वास वरूड : वरुड तालुक्यातील वाठोडा या गावाने पाणी फाऊंडेशनच्यावतीने आयोजिलेल्या ‘सत्यमेव जयते वॉटर कप’ स्पर्धेत यशस्वी होऊन ५० लाख रुपयांचे पहिले बक्षीस पटकविण्याचा ग्रामस्थांनी चंग बांधला आहे. सोमवारी तीन तासांत वाठोड्यातील सर्वच महिला, पुरुष, ज्येष्ठ नागरिक अशा ३०० ग्रामस्थांनी सुमारे ५० फूट लांबीचा बंधारा उभारून तालुक्यात आदर्श घडविला. पुढील काळात सध्या ड्रायझोन म्हणून जाहीर झालेला वरूड तालुका दुष्काळमुक्त होण्याची चिन्हे दिसत आहेत. याचे श्रेय विभागीय आयुक्त ज्ञानेश्वर राजूरकर, जिल्हाधिकारी किरण गित्ते व त्यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील सर्व महसूल, कृषी यंत्रणा व ग्रामस्थांना जाते.गावातील सुमारे ३०० महिला-पुरुष, ज्येष्ठ नागरिक, शालेय मुला-मुलींचाही प्रचंड उत्साह होता. उपस्थित ग्रामस्थांनी ५०-५० च्या सहा रांगा लावून साखळी पद्धतीने काढलेला गाळ एकत्र करून बंधारा तयार केला. १-२ ट्रॅक्टर भरून दगड बंधाऱ्यावर टाकुन पिचिंग करण्यात आली. आयुक्त ज्ञानेश्वर राजूरकर, जिल्हाधिकारी गित्ते, तहसीलदार भुसारी, जिल्हा माहिती अधिकारी सुरेश काचावार, सरपंच मनोज बाडे, उपसरपंच सरोज उपासे, पंचायत समितीचे माजी सभापती नीलेश मगरदे यांच्यासह गावातील सर्वच नागरिक सहभागी झाले होते. ग्रामस्थांनी वाठोडा या गावी आतापर्यंत १५० सलग समतल चर तसेच तलावातील गाळ काढणे, बंधारा बांधणे, ६-७ पांदण रस्ते अशी कामे झाली आहेत. ज्यांना श्रमदान करता येत नाही, अशा संजय गांधी निराधार योजनेचे लाभधारक ज्येष्ठ नागरिकांनी प्रत्येकी १००-२०० रुपये देऊन पाच हजार रुपये निधी जमा केला, हे येथे उल्लेखनीय. (प्रतिनिधी)
वाठोडा गावात तीन तासांत श्रमदानातून उभारला बंधारा
By admin | Published: May 07, 2016 12:42 AM