अमरावती: वैद्यकीय प्रतिपुर्तीचे बिल मंजूर करून देण्याच्या मोबदल्यात १३ हजार रुपयांची लाच घेताना शिक्षण उपसंचालक कार्यालयातील वरिष्ठ लिपिकाला ट्रॅप करण्यात आले. २१ जून रोजी शिक्षण उपसंचालक कार्यालयस्थित माध्यमिक विभागातील कक्ष क्रमांक चारमध्ये त्याने लाच स्विकारली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ही कारवाई केली. रुपेश प्रताप सिंग ठाकूर (३३) असे लाचखोर बडे बाबुचे नाव आहे.
यातील तक्रारदार हे वाशिम जिल्हयातील एका कनिष्ट महाविद्यालयात कनिष्ठ लिपिक पदावर कार्यरत आहेत. त्यांच्या वडिलांवर मुंबई येथे उपचार झाला. त्यांनी वडिलांच्या ३.३७ लाख रुपयांचे वैद्यकीय प्रतिपूर्तीचे बिल मंजुरीसाठी येथील शिक्षण उपसंचालक कार्यालयात टाकले. ते मंजूर करण्यासाठी वरिष्ठ लिपिक रुपेश ठाकूर हा १५ हजार रुपये लाच मागत असल्याची तक्रार त्या लिपिकांनी अमरावती एसीबीकडे नोंदविली. तक्रारीची २१ जून रोजी पडताळणी केली. पडताळणीदरम्यान ठाकूरने लाचेची मागणी करून १३ हजार रुपये स्वीकारण्याची तयारी दर्शविल्याचे निष्पन्न झाले. व लगेचच त्याला त्याच्याच कार्यालयात लाचेची ती रक्कण स्विकारताना रंगेहाथ पकडण्यात आले. त्याच्याविरूध्द शहर कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
यांनी केली कार्यवाही
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधिक्षक मारूती जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरिक्षकद्वय योगेशकुमार दंदे व अमोल कडू यांच्या नेतृत्वातील अंमलदार नंदकिशोर गुल्हाने, आशिष जांभोळे, शैलेश कडू, चालक पीएसआय सतीश किटुकले, चंद्रकांत जनबंधू आदींनी केली.