सावरखेड पूलवजा बंधारा : पुलांना कठडे, संरक्षण भिंतीमध्ये पाणी जाण्यासाठी पाईप गरजेचेअमरावती : सावरखेड येथील बंधाऱ्याच्या संरक्षक भिंतीमध्ये गावातील पाणी सोडण्यासाठी पाईप टाकणे, या बंधाऱ्याच्या स्लॅबची डागडुजी व पुलास कठडे यासह अन्य कामासाठी प्रशासकीय यंत्रणाद्वारा बुडीत क्षेत्राचा बागुलबुवा करण्यात येत असल्याने हा अडीच हजार नागरिकांच्या जीवाशी खेळ आहे. पेढी प्रकल्पाला १२ आॅगस्ट २०१४ रोजी प्रशासकीय मान्यता मिळाली. या प्रकल्पाचे बुडीत क्षेत्रात अळणगाव, कुंडखुर्द, कुंड सर्जापूर, गोपगव्हाण, हातुर्णा ही पाच गावे येतात. या बाधित गावांचे पुनर्वसन सन २०१७-१८ पर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे. याच प्रकल्पाच्या अंशत: बुडीत क्षेत्रात ओझरखेड व सावरखेड ही गावे येतात. यामध्ये सावरखेडच्या ४०० घरांपैकी केवळ ४० ते ५० घरेच फक्त बुडीत क्षेत्रात आहेत. ९० टक्के गावाचा बुडीत क्षेत्राशी संबंध नसतानाही जिल्हा परिषद बांधकाम विभाग व लघुसिंचन पाटबंधारे विभागाद्वारा बुडीत क्षेत्राचा भाग म्हणून विकास कामाकडे दुर्लक्ष केल्या जात आहे. शासनाचे २६ मे २००५ चे निर्णयानुसार बुडीत क्षेत्रात नागरिकांना मूलभूत सुविधा पुरविण्यास शासनाचे कुठलेही प्रतिबंध नसल्याचे स्पष्ट केले असतानासुद्धा पेढी नदीवरचा पूलवजा बंधाऱ्याची दुरुस्तीव व अन्य कामे करण्यास प्रशासकीय यंत्रणेद्वारे टाळाटाळ केली जात आहे. एवढेच नव्हे, तर महात्मा फुले अभियानांतर्गत या पुलाची बुडीत क्षेत्र असल्याने कामे करता येत नाही. अशा शेऱ्यानिशी अंदाजपत्रक परत पाठविल्याचा प्रकार घडला. ‘लोकमत’ने हा प्रश्न लोकदरबारात मांडल्यामुळे जिल्हाधिकारी किरण गित्ते यांनी गांभीर्याने घेतले व तत्काळ पुलाची दुरुस्ती करण्याचे निर्देश दिलेत. त्यामुळे प्रशासकीय यंत्रणांनीदेखील बुडीत क्षेत्राचा बागुलबुवा न करता अन्य कामे करण्याची गरज निर्माण झाली आहे. (प्रतिनिधी)
बुडीतक्षेत्राचा बागुलबुवा, प्रशासनाची पळवाट
By admin | Published: August 10, 2016 12:02 AM