लोकमत न्यूज नेटवर्क अमरावती :बडनेरा व अमरावती विधानसभा मतदारसंघाची मतमोजणी २३ नोव्हेंबर रोजी मार्डी रोडस्थित लोकशाही भवन येथे सकाळी आठ वाजता सुरू होणार आहे. ही मतमोजणी प्रक्रिया सुरू असताना लोकशाही भवन परिसरात मोठ्या संख्येने नागरिक सहभागी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे खबरदारीची उपाययोजना म्हणून २३ नोव्हेंबर रोजी सकाळी सहा वाजतापासून मतमोजणी प्रक्रिया पूर्ण होईपावेतो बियाणी चौक ते विद्यापीठ चौक या मार्गावरील सर्व प्रकारची वाहतूक बंद करण्यात येणार असल्याची अधिसूचना वाहतूक शाखेने काढली आहे.
बियाणी चौक ते तपोवन गेटपर्यंतची वाहतूक बंद राहणार असल्याने पोलिस प्रशासनाने पर्यायी मार्गदेखील जाहीर केले आहेत. माडी मार्गे येणाऱ्या तसेच तपोवन गेट परिसरातील निवासी वसाहतीतील वाहनचालकांना अमरावती शहरात येण्याकरिता अंध विद्यालय, विद्यापीठ चौक, रचना सृष्टी, विक्रांत लॉन, दंत महाविद्यालय, चपराशीपुरा, वडाळी, ओवरब्रीज हा पर्यायी मार्ग असेल. बियाणी चौक येथून मार्डी रोडकडे तसेच तपोवन परिसरातील निवासी वसाहतीत जाणाऱ्या वाहनचालकांना बियाणी चौक, चपराशीपुरा, अंध विद्यालय, वडाळी, ओवरब्रीज चौक, दंत महाविद्यालय हा मार्ग असेल. बियाणी चौक ते विद्यापीठ चौक मार्गावरील चिलमछावणी, व्यंकव्यापुरा, जिजाऊनगर, ओम कॉलनी रहिवासी वाहनचालकांनी मुख्य मार्गावर प्रवेश बंद राहणार असल्याने त्यांनी परिसरातील उपलब्ध पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. शिवनेरी कॉलनी, पंकज कॉलनी परिसरातील रहिवासी नागरिक व या मार्गावरील कृषी विभाग, पशुसंवर्धन विभाग कार्यालयातील कर्मचारी यांना पर्यायी मार्ग नसल्याने त्यांनी आपल्या वाहनाने कार्यालय, निवासस्थानी ये-जा करण्यासाठी आवश्यक वेळी बियाणी चौकाकडे जाणाऱ्या मार्गाचा वापर करावा. सूट देण्यात आलेल्या निवासी नागरिकांनी रहिवास पुरावा तसेच कार्यालयीन कर्मचाऱ्यांनी सोबत कार्यालयीन ओळखपत्र सोबत बाळगावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.
"या अधिसूचनेचे जो कोणी वाहनचालक पालन करणार नाही, त्यांच्याविरुद्ध कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल. आदेशात नमूद निर्बंधाचे सर्व वाहनचालकांनी काटेकोरपणे पालन करून पोलिस विभागास आवश्यक सहकार्य करावे. ही अधिसूचना शनिवार सकाळी सहापासून मतमोजणी होईपर्यंत लागू असेल." -कल्पना बारवकर, पोलिस उपायुक्त