कोरोनाचा फटका, जिल्ह्यातील मोठा बाजार
बड़नेरा : येथील गुरांच्या बाजाराला कोरोना काळातील लॉकडाऊनचा मोठा फटका बसला आहे. अनलॉकनंतरही आर्थिक उलाढाल मंदावलेलीच आहे. या बाजारासाठी शेतकरी महत्त्वाचा दुवा आहे. तोच नापिकीच्या संकटात सापडल्याने बाजारावर अवकळा आली आहे.
कृषी उत्पन्न बाजार समिती अमरावतीच्या अंतर्गत बड़नेऱ्यात दर शुक्रवारी गुरांचा बाजार भरतो. कोरोना संसर्गाचा या बाजारावर मोठा परिणाम झाल्याच्या प्रतिक्रिया येथे येणाऱ्या खरेदी-विक्रीदारांमध्ये आहे. सर्वात मोठा बाजार म्हणून ओळख असणाऱ्या या बाजारात महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान, पंजाब, दिल्ली, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेशासह इतरही राज्यांतून गुरे विक्रीसाठी येत असतात. विशेष करून म्हशींचा अधिक समावेश असतो. महागड्या म्हशी राज्या-राज्यातून विक्रीसाठी येतात. कोरोनाच्या संसर्गात बाजार बंदच होता. तीन ते चार महिन्यांपासून बाजार भरणे सुरू झाले. सुरुवातीला विक्रीसाठी येणाऱ्या जनावरांची संख्या अत्यंत कमी होती. आता गर्दी वाढली आहे. मात्र, खरेदीदार नसल्यामुळे बाजारातील उलाढालीवर मोठा परिणाम जाणवत आहे. यंदा शेतकऱ्यांना बराच नापिकीचा फटका बसला. त्यात कोरोनाच्या संकटाने बहुतांश शेतकऱ्यांनी गुरांच्या बाजाराकडे पाठ फिरवली आहे. पैसाच नाही, जनावरे विकत घेणार कशी, हा प्रश्न शेतकऱ्यांचा आहे. बाजारात जनावरांच्या खरेदी-विक्रीत शेतकरी महत्त्वाचा दुवा असतो. येथील बाजारावर बऱ्याच लोकांना रोजगार मिळतो. प्रामुख्याने जनावरे वाहून नेणाऱ्या वाहनचालकांनादेखील त्याचा आर्थिक फटका बसलेला आहे. असे असले तरी लवकरच बाजाराची उलाढाल पूर्वपदावर येईल, अशी आशा खरेदी विक्रीदार बाळगुन आहेत. बाजार समितीनेदेखील बाजारातील आर्थिक उलाढाल पूर्वपदावर येण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज असल्याचे बोलले जात आहे. परिसरात सर्वात मोठा गुरांचा बाजार म्हणून याची ओळख आहे.