पान २ ची बॉटम
मम्मी-पप्पाची सायकलस्वारी, बच्चेकंपनीचे बोटिंग लक्षवेधक
अनिल कडू
परतवाडा : चिखलदरा पर्यटननगरीतील देवी पॉईंटवर पर्यटकांना चक्क बहिरमच्या यात्रेचा आनंद मिळत आहे. यात मम्मी-पप्पाची सायकलस्वारी आणि बच्चे कंपनीचे बोटिंग लक्षवेधक ठरले, तर उकडलेल्या बोरांच्या गोडव्याने पर्यटकांच्या या आनंदात अधिकच भर घातली आहे.
घोडे, उंट, बैलगाडी, झुले, मम्मी-पप्पा सायकल, लहान मुलांच्या बोटिंगकरिता साठवलेले पाणी आणि उड्या मारायला एअर स्टॅच्यूसह सर्वच या ठिकाणी उपलब्ध आहे. अगदी बहिरमची जत्राच त्या ठिकाणी अवतरली आहे. यात कशाचाही आनंद घ्या, कशावरही बसा, व्यक्तीमागे ५० रुपये मोजावे लागतात.तेथे उपलब्ध सायकलवर एकाच वेळेस दोघांना बसता येतं. सायकल चालविण्याचा आनंद घेता येतो. यात मम्मी-पप्पा एकत्रपणे सायकल चालवतात. बहीण-भाऊ दोघेही सायकलीचा आनंद घेतात. पर्यटकांकरिता या ठिकाणी वीसहून अधिक सायकली आहेत.
पर्यटननगरीत शक्कर तलावात बोटिंगची व्यवस्था होती. या तलावाची दुरुस्ती सुरू असल्यामुळे तेथील बोटिंग बंद आहे. पण, यावर मात करणारे बोटिंग या जत्रेत लहान मुलांसाठी उपलब्ध आहे. कृत्रिमरीत्या पाणी गोळा करून त्यात लहान मुले बोटिंगचा मनसोक्त आनंद घेत आहेत.
---घोडेस्वारी ---
जत्रेच्या ठिकाणी दहा ते बारा घोडे पर्यटकांकरिता उपलब्ध आहेत. यातील काही घोडे आक्रमक आहेत. या घोड्यांवर स्वार होऊन पर्यटक तिथल्या तिथे रपेट मारतात. याकरिता ते प्रतिव्यक्ती पन्नास रुपयेही मोजतात. पण, घोडेस्वारी करताना पर्यटकांच्या सुरक्षिततेची कुठलीही हमी त्या ठिकाणी घेतली जात नाही. नवरदेव म्हणून घोड्यावर स्वार होण्यापलीकडे अनुभव नसलेल्या हौशी पर्यटकांसाठी ते धोकादायक ठरत आहे. यातून लहान-मोठे अपघातही त्या ठिकाणी घडत आहेत. २० जूनला दुपारी साडेचारच्या सुमारास तेथे दोन अपघात घडले. यात एक पुरुष पर्यटक, तर एक महिला पर्यटक वेगवेगळ्या घोड्यांवरून चक्क खाली पडले, तर दोन पर्यटक घोड्यावरून घसरण्यापासून बचावले.
--- कोरोना दुर्लक्षित---
बहिरमरूपी जत्रेतील पर्यटकांच्या गर्दीत कोरोनाला दुर्लक्षित केले गेले. बहुतांश पर्यटकांना मास्क नव्हता. सोशल डिस्टंसिंगचा फज्जा उडाला होता. धामणगाव गढी मार्गे चिखलदऱ्याला जाताना पंधरा किलोमीटर अंतराच्या दगडापुढे सिमेंट बंधाऱ्यात अडवलेल्या पाण्यात रविवारी काही हौशी पर्यटकांनी आंघोळीचा मनमुराद आनंद लुटला. सानथोरांनी तेथील गढूळ पाणी अंगावर घेतले. या पाण्याला त्यांनी आयुर्वेदिक पाण्याची उपमा दिली. या आंघोळीदरम्यान एकच गर्दी होती.