अमरावती : शहरात रेमडेसिविर इंजेक्शनच्या काळाबाजारप्रकरणी सहा आरोपींचा बुधवारी न्यायालयाने जामीन रद्द केला.
डॉ. पवन दत्तात्रेय मालुसरे, डॉ. अक्षय मधुकर राठोड, नर्स पूनम भीमराव सोनोने, वाॅर्डबॉय शुभम कुमोद सोनटक्के, शुभम शंकर किल्लेकर व विनीत अनिल फुटाणे व एक लॅब टेक्नीशियन अशा सात जणांविरुद्ध गुन्हे शाखेच्या तक्रारीवरून फ्रेजरपुरा ठाण्यात १२ मे रोजी गुन्हा दाखल होऊन आरोपींना अटक झाली होती.
त्यापैकी जामीन मिळण्याकरिता न्यायालयात अर्ज सादर केल्यानंतर पाच जणांना न्यायालयाने अंतरिम अटकपूर्व जामीन मंजूर केल्याने ते बाहेर होते. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन सदर तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला. त्यांना अधिक तपास गरजेचे असल्याने आरोपीला जामीन देऊ नये असे न्यायालयाला विनंती केली. न्या सर्वच आरोपींचा जामीन रद्द करण्यासाठी तपास अधिकाऱ्यांनी न्यायालयात बुधवारी से दाखल केला. दोन्ही पक्षाच्या वकिलांनी युक्तिवाद केला. त्यानंतर न्यायालयाने सहा जणांचा जामीन रद्द केला, असे आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक व गुन्हे शाखेचे प्रभारी सहायक पोलीस आयुक्त शिवाजी बचाटे यांनी सांगितले. सातपैकी एक जण क्वारंटाइन सेंटरमध्ये आहे. उर्वरित सहापैकी विनीत फुटाने न्यायालयीन कोठडी अंतर्गत मध्यवर्ती कारागृहात आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी याप्रकरणाची सखोल चौकशीची मागणी केली होती. राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पोलीस महासंचालक यांना पत्र पाठवून दोषींना कठोर शासन करण्याच्या दृष्टीने तपास करावा, अशी मागणी केली होती, हे विशेष!
कोट
हेप्रकरण गंभीर आहे. या प्रकरणात अधिक तपासाच्या दृष्टिकोनातून जामीन अर्ज रद्द करण्याची विनंती न्यायालयाला केली होती. तसेच काही आरोपींना पीसीआरची मागणी करण्यात येईल.
- शिवाजी बचाटे, पोलीस निरीक्षक आर्थिक गुन्हे शाखा