फौजदारी कारवाईची मागणी : सरकारी कामगार, अधिकारींना विचारला जाबलोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : "अड्डा २७" हा हुक्का पार्लर व्यवसाय अनधिकृतपणे सुरू ठेवणाऱ्या संचालकावर फौजदारी कारवाई करण्यात यावी, या मागणीवरून बजरंग दलाचे कार्यकर्ते आक्रमक झालेत. यासंदर्भात त्यांनी सोमवारी सहायक कामगार आयुक्त कार्यालयात ठिय्या मांडून सरकारी कामगार अधिकारी डी.बी.जाधव यांना जाब विचारल्याने एकच गोंधळ उडाला होता. रेल्वे स्थानक ते बसस्थानक मार्गादरम्यानच्या बॉम्बे स्ट्रिट या प्रतिष्ठानात वरच्या मजल्यावर विनापरवाना हुक्का पार्लर सुरू होते. आईस्क्रिम पार्लरचा परवाना व सहायक कामगार आयुक्त कार्यालयाच्या नोंदणी प्रमाणपत्राच्या आधारेच "अड्डा २७" या आस्थापनाखाली हुक्का पार्लरसोबतच डॉन्स पार्लर सुरू होते. या गंभीर प्रकारामुळे अमरावतीची संस्कृती धोक्यात येत असल्याचे निदर्शनास येताच बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी पुढाकार घेत हुक्का पार्लरविरोधात एल्गार पुकारला. सोमवारी बजरंग दलाचे महानगर संयोजक निरजंन दुबे यांच्यासह बिपीन गुप्ता, जयेश राजा, बंटी पारवानी, शुभम गोयल, प्रवीण गिरी, शुभम भुजाडे, सुमित साहू, अनिल साहू, शरद अग्रवाल, दिनेशसिंग, अमोल चौधरी, संजय नागपुरे, प्रवीण सावळे, पवन श्रीवास व राजेश दुबे यांनी सहायक कामगार आयुक्त कार्यालय गाठून सरकारी कामगार अधिकारी डी.बी.जाधव यांचे कक्ष गाठले. यावेळी त्याठिकाणी दुकाने निरीक्षक कल्पना कांबळेसुध्दा उपस्थित होत्या. कार्यकर्त्यांनी हुक्का पार्लर कायमस्वरुपी बंद करून अनधिकृतपणे व्यवसाय चालविणाऱ्या अड्डा २७" हुक्का पार्लरच्या संचालकाविरुद्ध फौजदारी कारवाई करण्यासंदर्भात पोलिसांना पत्र द्यावेत, अशी मागणी रेटून धरली. सहायक कामगार आयुक्त कार्यालयाच्या एकमात्र नोंदणीच्या आधारेच अड्डा-२७ च्या संचालकांनी हुक्का पार्लर व्यवसाय चालविला. हा प्रकार शासनाची दिशाभूल व फसवणूक करण्याचा प्रकार आहे. ही बाब बजरंग दलाने सरकारी कामगार अधिकाऱ्याच्या निदर्शनास आणून दिली. त्यानुसार अड्डा २७ च्या संचालकाविरुद्ध फौजदारी कारवाईच व्हावी, अशी मागणी बजरंग दलाने सरकारी कामगार अधिकारी जाधव यांच्याकडे रेटून धरली होती. जाधव यांनीही आश्वासन देत पुढील प्रक्रिया सुरू केली होती. बजरंग दलाच्या या आक्रमक आंदोलनाने शहरात खळबळ उडाली होती.
हुक्का पार्लरविरोधात बजरंग दल आक्रमक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2017 12:02 AM