वनोजाबाग (अंजनगाव सुर्जी) (अमरावती) : दीड महिन्यांआधी मध्यप्रदेशातील बालाघाट येथून बेपत्ता झालेला १५ वर्षीय मुलगा तालुक्यातील खिरगव्हाण येथे आढळून आला. गूगल या सर्च इंजिनवर शोध घेऊन रहिमापूर पोलिसांनी बालाघाट पोलीस ठाण्याशी संपर्क साधला. तातडीने सूत्रे फिरविण्यात आली अन् शनिवारी त्याला कुटुंबाच्या स्वाधीन करण्यात आले. रहिमापूर पोलीस ठाण्यात आपल्या मुलाला सुखरूप पाहून त्याच्या पालकांना आनंदाचे भरते आले. रहिमापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील खिरगव्हाण येथील पोलीस पाटील राजू घोगरे यांना ७ आॅगस्ट रोजी एक मुलगा पाण्यात भिजताना दिसून आला. त्यांनी त्याच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो काहीही बोलत नसल्याने घोगरे यांनी याबाबत रहिमापूरचे ठाणेदार शेख जमील यांना कळविले. त्यादरम्यान तो मुलगा गतिमंद असल्याचे त्यांच्या लक्षात आले. ठाणेदारांनी घटनास्थळ गाठून त्याला विचारणा केली. महत्प्रयासानंतर त्याने स्वत:ची ओळख ‘दिनेश लक्ष्मण उईके, गाव कावेली, तहसील परसोडा, जिल्हा बालाघाट’ अशी माहिती दिली. त्या माहितीवरून रहिमापूर पोलिसांनी गूगलवरून कावेली गावासह नजीकच्या पोलीस ठाण्याचा शोध घेतला. त्याचे गाव बालाघाट पोलीस ठाण्याच्या हद्दीत येत असल्याने तेथे संपर्क साधण्यात आला. त्या पोलिसांनी दिनेशच्या पालकांशी संपर्क करून त्यांचा मुलगा अमरावती जिल्ह्यातील रहिमापूर पोलीस ठाण्यात असल्याचे सांगितले. त्या माहितीवरून त्याचे पालक शनिवारी रहिमापुरात पोहोचले. तो दीड महिन्यांपासून घरून बेपत्ता झाला होता, अशी माहिती समोर आली. त्याला त्याच्या पालकांच्या स्वाधीन करण्यात आले.
बालाघाटचा गतिमंद मुलगा खिरगव्हाणमध्ये गवसला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 10, 2019 8:56 PM