जिल्हा कचेरीवर धडक : गुरूदेव सेवा मंडळाची शासनाकडे मागणीअमरावती : पंढरपूर येथील निवृत्ती महाराज वक्ते यांनी लिहिलेल्या ‘संत तुकाराम महाराज सदेह वैकुंठगमन’ या पुस्तकात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, युगग्रंथ ग्रामगीता व ग्रामगीतेचे संपादक सुदामदादा सावरकर यांच्याबाबत विकृत स्वरुपात टीका केली आहे. मात्र कुठलेच पुरावे दिले नाहीत. त्यामुळे या पुस्तकांवर शासनाने तत्काळ बंदी आणावी. लेखकावर गुन्हे दाखल करावेत, या मागणीसाठी गुरुदेवभक्तांनी शनिवारी जिल्हा कचेरीवर धडक देऊन मागण्यांचे निवेदन अ. भा. श्रीगुरुदेव सेवा मंडळाद्वारा अप्पर जिल्हाधिकाऱ्यांना सादर केले.घराघरात राष्ट्रसंतांची ग्रामगीता ही आदर्श ग्रंथ म्हणून वाचली जाते. या ग्रंथात ‘संडास साफ करणारी गीता’ असे वक्ते यांनी संबोधले आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांवरदेखील पुस्तकात खोटे आरोप करण्यात आले आहेत. हा दोन संप्रदायात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न आहे. राष्ट्रसंतांचा विचार समजावून नाहीसा करण्याचे हे षडयंत्र असल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला. राष्ट्रसंतांच्या विचाराचे पाईक म्हणून गुरुदेव भक्तांनी या घटनेचा निषेध केला. या पुस्तकावर शासनाने तत्काळ बंदी आणावी व समाजद्रोही लेखकावर गुन्हे दाखल करून तत्काळ अटक करावी, अशी मागणी अखिल भारतीय गुरुदेव सेवा मंडळाने अप्पर जिल्हाधिकारी खुशालसिंग परदेशी यांना निवेदनाद्वारे केली. शनिवारी दुपारी १२ वाजता पंचवटी चौकातील गुरुदेव कार्यालया जवळ शेकडो गुरुदेव भक्त जमले राष्ट्रसंताच्या नावाचा जयघोष करीत रॅली काढण्यात आली. रॅलीचा समारोप जिल्हाधिकारी कार्यालया समोर झाला. यावेळी आचार्य हरिभाऊ वेरुळकर, सर्वाधिकारी प्रकाश महाराज वाघ, अध्यात्म गुरुकुलचे संचालक रवी मानव, सप्त खंजेरीवादक सत्यपाल महाराज, भूमिका कला मंचाचे संचालक मनोहर भिष्णूरकर, सरचिटणीस जनार्दनपंत बोथे, पुष्पाताई बोंडे, काँग्रेस कामगार सेलचे जिल्हाध्यक्ष पंकज देशमुख, मनोहर साबळे, गणेश जगताप, रघुनाथ वाडेकर, प्रवीण राऊत यांच्यासह शेकडो गुरुदेवभक्त उपस्थित होते. (प्रतिनिधी)
‘त्या’ पुस्तकावर बंदी आणा
By admin | Published: August 20, 2016 11:59 PM