संचात मनुष्यबळ वाढविण्यास परवानगी द्या
अमरावती : दीड वर्षापासून कोरोनामुळे विवाह समारंभावर निर्बंध घातल्याने बॅन्ड कलावंतांचा रोजगार बुडाला. यामुळे बॅन्ड कलावंतावर उपासमारीची वेळ आली. आता कोरोनाचा संसर्ग कमी झाल्यामुळे निर्बंध शिथिल झाले. परंतु विवाह समारंभात पुरेशा मनुष्यबळात बॅन्ड वाजविण्यास परवनगी दिलेली नाही. त्यामुळे बॅन्ड कलावंतांना परवानगी द्यावी, या मागणीसाठी मंगळवारी महेंद्र सरकटे यांच्या नेतृत्वात बॅन्ड कलावंत वाजंत्री वाजवित थेट जिल्हा कचेरीत पोहोचलेत. या प्रकारामुळे परिसरात काही वेळ तणाव निर्माण झाला होता. मात्र, आ. राणा यांच्या मध्यस्थीने हा तणाव निवळला.
जिल्ह्यात ५ हजारांवर बॅन्ड कलावंत आहेत. मात्र, दीड वर्षापासून लॉकडाऊनमुळे अनेक व्यवसायावर याचा विपरित परिणाम झालेला आहे. आता विवाह समारंभावर नियम व अटीचे निर्बंध काही प्रमाणात कायम आहेत. विवाह समारंभाला उपस्थितीची मर्यादा घातल्याने यावर अवलंबून असलेल्या बॅन्ड कलावंतावर उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे विवाह समारंभात बॅन्ड कलावंताचे पूर्ण संचालक वाद्य वाजविण्यास विनाशर्त परवानगी द्यावी, याकरिता वेळोवेळी निवेदन, आंदोलन केले. परंतु काहीच तोडगा निघाला नाही. १७ ऑगस्ट रोजी काही बॅन्ड कलावंत वाजंत्री साहित्य वाजवित परवानगीसाठी जिल्हा कचेरीत पोहोचले. या प्रकारामुळे काही वेळ तणाव निर्माण झाला होता. मात्र, आ.राणा यांनी बॅन्ड कलावंतांच्या मागण्या मान्य करून न्याय देण्याची शिष्टमंडळाच्यावतीने आरडीसी नितीन व्यवहारे यांचेकडे निवेदनाव्दारे केली. यावेळी महेंद्र सरकटे व कलावंत सहभागी झाले होते.