अमरावती : ग्रामपंचायत निवडणूक निकालाची रंगत आता वाढली आहे. उमेदवारी अर्ज दाखल झाले असून आता माघारीसाठी खेळ्या खेळल्या जाणार आहेत. निवडणूक बिनविराेध करण्यासाठी काही ठिकाणी हालचाली सुरू आहेत. तर काही ठिकाणी बंडोबांना थंडोबा करण्यासाठी गळ घातली जाणार आहे. माघार घेण्यासाठी संबंधितांना गोड गोड बोलले जाईलही पण माघारीसाठी जो काही शब्द दिलेला आहे तो भविष्यात पाळला जाईलच याची खात्री कोण देणार? हा यक्ष प्रश्न संबंधितांना सतावत आहे. दरम्यान, ज्या गावात गेल्या काही पंचवार्षिकमध्ये सरपंचपद खुले आहे त्या ठिकाणी आरक्षित जागांसाठी रस्सीखेच दिसून आली. जिल्ह्यातील ५५३ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी १५ जानेवारीला मतदान होत आहे. उमेदवारी अर्ज दाखल झाले असून आता ४ जानेवारीला दुपारी ३ वाजेपर्यत अर्ज मागे घेता येणार आहेत. त्यानंतर लगेच उमेदवारांना चिन्हांचे वाटप केले जाणार आहे. जिल्ह्यात निम्म्यापेक्षा जास्त ग्रामपंचायतींची निवडणूक होत असल्याने संपूर्ण जिल्हा ढवळून निघाला आहे. गावपातळीवर राजकारण कडाक्याच्या थंडीतही चांगलेच तापले आहे. यासाठी अनेक गावांतील चौकाचौकात, पारावर चहाच्या कँटिनवर, शेतात, धाब्यावर चर्चेचे फड रंगत आहेत. गावाची धुरा कोणाच्या खांद्यावर द्यायची यासाठी मोर्चेबांधणी सुरू आहे. भावी सरपंचांचा आखडा तापला असून कार्यकर्त्याची जुळवाजुळव सुरू आहे. उमेदवारी अर्ज मोठ्या संख्येने दाखल झाले असून आता माघार कोण कोण घेणार, याकडे लक्ष लागून राहिले आहे. काही ठिकाणी बंडखोरी झाली असून आघाड्या व पॅनेलचे गणित बिघडले आहे. बंडखोरी करणाऱ्यावर माघार घेण्यासाठी दबाबतंत्राचा वापर केला जाऊ शकतो. काहीतरी आमिषे दाखवून निवडणूक लढविण्यापासून संबंधितांना माघार घ्यायला लावण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत. माघारीची मुदत संपेपर्यत संबंधितांना गोड गोड बोलून वातावरण निमिर्ती केली जाणार आहे.
बॉक्स
सरपंच पदाची शाश्वती नाही...
पूर्वीचे चित्र उलटे होते. निवडणुकीपूर्वीच सरपंचपदाचे आरक्षण काढायचे. हे पद आरक्षित झाल्यास सरपंचपदासाठी निवडणूक लढवणारे व खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या सक्षम असलेले इच्छुक निवडणुकीतूनच माघार घ्यायचे. आता आरक्षणच अंधारात आहे. भविष्यात सरपंचपद पदरात पडेलच याची शाश्वती नाही. त्यामुळे अनेक इच्छुक ऑक्सिजनवर आहेत.