वनमजुरांची आस्थेने चौकशी
:
कार्यालयासह निवासस्थानालाही भेट
अनिल कडू
परतवाडा : मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या क्षेत्र संचालक पदी रुजू झालेल्या जयोती बॅनर्जी यांनी तब्बल १४ वर्षांनंतर परतवाड्यातील जुन्या आठवणींना उजाळा दिला. यात त्यांनी त्या वनमजुरांची आस्थेने चौकशी केली. त्यांच्यासोबत प्रत्यक्ष संवाद साधला. जुन्या कार्यालयासह निवासस्थानालाही त्यांनी भेट दिली. जयोती बॅनर्जी या २००७ ते २००९ पर्यंत परतवाडा येथील पश्चिम मेळघाट प्रादेशिक वन विभागात उपवनसंरक्षक म्हणून कार्यरत होत्या. २००९ मध्ये त्यांची परतवाडा येथून बदली केली गेली. मुदतपूर्व झालेल्या बदलीचा आदेश स्वीकारून त्या नव्या जागी रुजू झाल्यात. यानंतर तब्बल १४ वर्षांनंतर त्या बुधवारी (दि. १२) परतवाड्यात दाखल झाल्यात. त्याही मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या क्षेत्र संचालक म्हणून.
यादरम्यान मेळघाट वन्यजीव विभागाच्या उपवनसंरक्षक पीयूषा जगताप, सिपना वन्यजीव विभागाचे उपवनसंरक्षक अविनाशकुमार, मेळघाट प्रादेशिक वनविभागाच्या उपवनसंरक्षक गिंनी सिंह यांच्यासमवेत, मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या परतवाड्यातील साम्राज्याचे त्यांनी अवलोकन केले. यात त्यांना तो जुना काळ आठवला. ते मोकळे आवार, खुला परिसर, खुली जागा, व्हॉलिबॉलची नेट आठवली, पण त्यांना ते दिसले नाही. यातच त्यांनी परतवाडा येथील त्या आपल्या जुन्या कार्यालयाविषयी विचारणा केली.
मेरा ऑफिस कहा है ?
मेरा ऑफिस कहा है ? असा प्रश्नही उपस्थित केला.
लागलीच जुन्या कार्यालयात त्या पोहोचल्या. कार्यालयाचे अवलोकन त्यांनी केले. कार्यालयातील जुन्या आठवणींना उजाळा देत त्या आपल्या जुन्या सरकारी निवासस्थानी पोहोचल्यात. तेथे असलेल्या बाळू नामक वनमजुराची त्यांनी आस्थेने विचारपूस केली. या दरम्यान त्यांनी बंगल्यातील जुन्या आठवणी ताज्या केल्यात. बाजूलाच असलेल्या तत्कालीन उपवनसंरक्षकांच्या बंगल्याकडेही त्यांचे लक्ष गेले. यात बाळूला त्यांनी सोबतीला घेतले. खर तर त्या बंगल्यातील बॅनर्जींच्या त्यावेळेसच्या प्रत्येक आठवणींचा साक्षीदार हा बाळूच. या दौऱ्यात बाळूच खरा हीरो ऑफ द डे ठरला.
कुत्रा ठरला होता खलनायक
परतवाड्यातील शेजारचा बंगला रिकामा असला तरी त्या वेळेस या बंगल्यातील उपवनसंरक्षकांकडे असलेल्या कुत्र्याच्या ओरडण्याचा बराच त्रास त्यादरम्यान बॅनर्जी यांना व त्यांच्या वडिलांना सहन करावा लागला होता. हे कुत्र्याचे ओरडणे शेजारधर्मात वितुष्ट आणणारे ठरले होते. यात या कुत्र्याच्या ओरडण्याची तक्रार वरिष्ठ स्तरावरही पोहोचली होती.
त्यावेळसचे वनमजूर नवलकार, दिलीप गुजर, लिपिक हाडे, वनरक्षक डांगे यांच्याशीही त्यांनी संवाद साधला. त्यांच्यासह त्यांच्या कुटुंबीयांची आस्थेने चौकशी केली. कोरोनात काळजी घेण्याचा सल्लाही दिला.