लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : आधुनिक काळाची चिन्हे मानवाच्या दैनंदिन आयुष्यात जागोजागी दिसत असली तरी अमरावती जिल्ह्यातील बंजारा समाजातील स्त्रियांच्या जीवनपद्धतीवर कुठलाच परिणाम नसल्याचे दिसून येत आहे. आधुनिक काळाशी सुसंगत राहणीमान स्त्रियांनी अंगीकारले, तशा त्यांच्या शरीरावर असणारे दागिने कमी-कमी व्हायला लागले. बंजारा समाजातील स्त्रिया मात्र दागिन्यांचा सोस कमी करायला तयार नाहीत. किंबहुना, मेल्यावरच अंगावरील दागिने उतरतील, असा त्यांचा ठाम निश्चय असतो.स्त्रियांच्या गळ्यातील आभूषणे भारतीय संस्कृतीत सौभाग्याची प्रतीकं आहेत. तरी अशी एकही स्त्री नाही जिला दागिन्यांचं आकर्षण नाही. दागिन्यामुळेच स्त्रीचे सौंदर्य खुलते व त्यामुळेच दागिन्यांच्या दुनियेत नावीन्य पाहायला मिळते. परंतु, पूर्वापार चालणाऱ्या परंपरेनुसार बंजारा समाजातील स्त्रियांच्या गळ्यातील आभूषणे प्राचीन इतिहास सांगणाऱ्या नाण्यांच्या माळा एक नवलाईच म्हणावी लागेल.आधुनिक युगाचा स्वीकार करताना रूढी, परंपरा व वेशभूषा यात झपाट्याने बदल होताना दिसून येतो. परंतु, काही समाजांमध्ये बहुतांश परंपरा, राहणीमानात विशेष बदल जाणवत नाही. त्यांच्यापैकी एक घटक म्हणून बंजारा समाजाचा समावेश होतो. त्यांचे खानपान, वेशभूषा, संस्कृती, पोशाख आदी गोष्टींना आधुनिकतेचा लवलेश दिसून येत नाही.बंजारा समाजातील स्त्रियांच्या अंगावरील पोषाखामध्ये घागरा (फेटिया), अंगावर चढविण्याचा गोळका (काचळी) डोक्यावरील ओढणी अन् साथ लाभते ती वजनदार चांदीच्या दागिन्याची. ज्यात कान व डोक्याच्या मधल्या झुबक्याची टोपली, केसातील ओटी, मनगटापासून थेट ढोपरापर्यंत हस्तीदंती बांगड्या (बाल्या), दंडावरील बायटा अशा नखशिखांत आभूषणात सजलेली बंजारा स्त्री समाज संस्कृतीचे जतन करताना आढळते. पूर्वापार सोन्याच्या दागिन्यांचे अस्तित्व आहेच, परंतु बदलत्या काळात यात भर पडली ती इमिटेशन, बेंटेक्स अशा ज्वेलरीची टिकलीपासून पायातील जोडवी, मासळी आढळते.
काळाच्या ओघातही बदलली नाहीत बंजारा स्त्रियांची आभूषणे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 03, 2018 1:37 PM
आधुनिक काळाची चिन्हे मानवाच्या दैनंदिन आयुष्यात जागोजागी दिसत असली तरी अमरावती जिल्ह्यातील बंजारा समाजातील स्त्रियांच्या जीवनपद्धतीवर कुठलाच परिणाम नसल्याचे दिसून येत आहे.
ठळक मुद्देपोशाख, खानपानात आधुनिकतेचा लवलेशही नाही